मुंबई, 14 फेब्रुवारी: आज व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) आहे. अनेकजण आज त्यांच्या पार्टनरला प्रपोज करण्याचा विचार करत असतील. प्रपोज करण्यासाठी अंगठी, गुलाबाची फुलं, केक असा तामझाम देखील केला जातो. पण जोसेफ डेव्हिस या 48 वर्षीय इसमाला प्रपोज करणं चांगलंच महागात पडत आहे आणि कारणही तसंच आहे. फ्लोरिडामधील ही घटना आहे. जोसेफने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याच्या एक्सकडून चोरलेली अंगठी वापरली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो चांगलाच गोत्यात आला आहे. india.com ने याबाबत वृत्त दिले आहे.
मीडिया अहवालानुसार शुक्रवारपर्यंत तो पोलिसांना सापडला नव्हता. जोसेफ विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फ्लोरिडाच्या ऑरेंज सिटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला समजले की, तिच्या बॉयफ्रेंडने कुणाशी तरी साखरपुडा केला आहे. पोलिसांनी त्या घटनेपासून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.
(हे वाचा-Valentine Day Alert! डिस्काउंट डील्समधून व्हॅलेंटाइन डे ला लागू शकतो धोक्याचा व्हायरस)
ऑरेंज सिटीमध्ये (Orange City) राहणाऱ्या या महिलेच्या निदर्शनास त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचं फेसबुक अकाउंट आलं. ज्यामध्ये तिने जी अंगठी घातली होती जी ऑरेंज सिटीमधील महिलेच्या अंगठीशी मिळतीजुळती होती. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा ऑरेंज सिटीमधील महिलेने तिचा दागिन्यांचा बॉक्स चेक केला तेव्हा तिचे काही दागिने त्यात नव्हते. साखरपुड्याची अंगठी, वेडिंग बँड असं मिळून साधारण 6,270 डॉलर्सचा ऐवज गायब होता. यामध्ये तिच्या आजीने दिलेली अंगठी देखील गायब होती. त्याची दुसरी गर्लफ्रेंड ओरलँडोमध्ये (Orlando) राहत होती. अशी माहिती मिळते आहे की त्याने तिला देखील असेच फसवले आहे.
(हे वाचा-TikTok भारतीय ऑपरेशन्स विकण्याच्या तयारीत, आपल्याच प्रतिस्पर्ध्याला देणार हक्क)
ऑरेंज सिटीमधील महिलेने थेट ओरलँडो गाठले, त्यावेळी त्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने तिला यापैकी काही ऐवज तिला परत केला आणि दोघींनीही डेव्हिसबरोबर ब्रेक अप केला आहे. दरम्यान दोघी वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखत होत्या- जो ब्राउन आणि मार्कस ब्राउन.
हे प्रकरण केवळ चोरीपुरतं मर्यादित नाहीये, या प्रियकराने त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला ऑरेंज सिटीमधील पहिल्या गर्लफ्रेंडच्या घरी नेलं होतं जेव्हा ऑरेंज सिटीमधील महिला कामानिमित्त बाहेर होती. त्याने तिला सांगितलं होतं की हे घर त्याचं आहे आणि तो तिच्याबरोबर याठिकाणी मुव्ह इन होऊ इच्छित आहे. पण त्यानंतर तो गायब झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Valentine day, Valentine week