मुंबई, 13 मार्च : मशिदींवरच्या भोंग्यांच्या प्रकरणामुळे मागच्या वर्षी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. मशिदींवरचे भोंगे बंद करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यानंतर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आता इस्लामिक राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्येही मशिदीवरचे भोंगे काढण्याचे आदेश तिथल्या सरकारने दिले आहेत. मुस्लिम समाजासाठी सगळ्यात पवित्र असलेल्या रमझानला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने काही कठोर नियम केले आहेत, ज्यामध्ये मशिदींवरची भोंगाबंदीही आहे.
रमझानच्या पवित्र महिन्यामध्ये कोणते नियम पाळण्यात येतील, याबाबतची नियमावली सौदी अरेबियाच्या इस्लामिक मंत्रालयाने जाहीर केली आहे. यात मशिदींवरच्या लाऊडस्पीकरवर बंदी, आयडीशिवाय इतिकाफला (मशिदीमध्ये राहणे) परवानगी नाही, नमाजच्या प्रसारणाला बंदी, मशिदींमध्ये इफ्तारला बंदी, याचा समावेश आहे.
सौदी अरेबियाच्या इस्लामिक मंत्रालयाच्या या कठोर नियमांमुळे जगभरातल्या मुस्लिम समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या रमझानमध्ये सौदी अरेबियाने 10 मुद्द्यांची नियमावली बनवली आहे. मशिदीमध्ये येणाऱ्या भाविकांना जेवण देण्यासाठी मशिदींना वर्गणी गोळा करता येणार नाही. अशाप्रकारचं जेवण मशिदीच्या बाहेर असलेल्या भागामध्ये आयोजित करण्यात येईल. हे जेवण मशिदीच्या इमामांच्या मार्गदर्शनाखालीच बनवलं जावं, असं सौदी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
Bin Salman announces new orders to restrict Ramadan in #SaudiArabia: - No loudspeakers - No broadcast of prayers - No itikaf without ID (state surveillance on the 'zealous') - Keep prayers short - No collecting donations - No kids in mosques for prayers - No iftar inside mosques pic.twitter.com/D8KBMzIzXo
— Sami Hamdi سامي الهاشمي الحامدي (@SALHACHIMI) March 7, 2023
इमामांनीही संपूर्ण महिना मशिदींमध्येच राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. रमझानच्या महिन्यातले दिवसाचे सगळे नमाज भाविकांना त्रास न देता वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारीही इमामांची असेल, असं या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. शेवटच्या 10 दिवसांमध्ये इतिकाफला परवानगी द्यायची जबाबदारीही इमामांना देण्यात आली आहे. तसंच मशिदीमध्ये फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांमुळे इतर भाविकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे रमझानच्या काळात लहान मुलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.