लंडन, 24 मार्च : केळी (Banana) हे फळ ऊर्जेचा स्रोत मानलं जातं. पोटॅशियमसह अनेक पौष्टिक घटकांनी युक्त असं हे फळ सगळ्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध असतं. पण याच केळ्यासाठी कोणाला दीड लाखांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागली असेल असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही नां पण हे खरं आहे. लंडनमध्ये अशी घटना घडली आहे.
लंडनमधील (London) एका महिलेला केळ्यांच्या एका घडासाठी तब्बल 1600 युरो मोजावे लागले आहेत. या महिलेचं नाव किंब्रे बार्नेस (Kimbre Barnes) आहे. एक दिवस कामाला जात असताना दिवसभरात खाण्यासाठी काही पदार्थ घेण्यासाठी ती वाटेतील मार्क्स अँड स्पेन्सरच्या (Marks and Spensers) दुकानात शिरली. तिनं खाण्याचे काही पदार्थ आणि एक केळ्यांचा घड घेतला. या वस्तूंचे पैसे तिनं अॅपल पेद्वारे (Apple Pay) दिले. काही क्षणातच तिच्या फोनवर नोटिफिकेशन आलं, की मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये शॉपिंगसाठी तिनं 1600 युरो म्हणजेच तब्बल एक लाख 60 हजार 596 रुपये खर्च केले आहेत.
याबाबत द टेलिग्राफशी बोलताना बार्नेस म्हणाली की, ती कामाला जाण्याच्या घाईत होती म्हणून तिनं पैसे देण्यासाठी अॅपल पेचा (Apple Pay) वापर केला, आणि हा प्रकार घडला. नोटिफिकेशन मिळाल्याक्षणी तिनं दुकानातील स्टाफच्या हे निदर्शनास आणून दिलं आणि रिफंडची मागणी केली. त्या वेळी तिला काही तांत्रिक अडचणींमुळे त्या शॉपमध्ये याचा रिफंड (Refund) मिळू शकत नाही, ती मार्क्स अँड स्पेन्सरच्या दुसऱ्या शाखेत गेल्यास तिला रिफंड मिळेल, असं सांगण्यात आलं.
बार्नेस तिथून तब्बल 45 मिनिटं चालत मार्क्स अँड स्पेन्सरच्या दुसऱ्या शाखेत आली. तिथे कंपनीच्या वतीने झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. काँटॅक्टलेस पेमेंट सिस्टीममध्ये (Contactless Payment System) कधीतरी एखादा एरर येतो तशी ती बार्नेस यांच्या पेमेंट वेळी आल्यानं त्यांच्या खात्यातून अधिक पैसे कट झाल्याचं मार्क्स अँड स्पेन्सरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. बार्नेस यांना कंपनीने रिफंड तर दिलंच पण झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्याची तयारीही दाखवल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
सध्याच्या कोरोना साथीच्या काळात आर्थिक व्यवहारांसाठी काँटॅक्टलेस पेमेंट सिस्टमचा वापर वाढला आहे. मात्र याचा वापर करणाऱ्या लोकांनीही आपले किती पैसे जात आहेत, यावर लक्ष ठेवणंही गरजेचं आहे. तसंच ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगणंही आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, International, London, Money, Online payments, Online shopping, Shocking news