लंडन 06 डिसेंबर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणांविरोधात पंजाबमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 10 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं लोण आता विदेशातही पोहोचलं असून लंडनमधल्या भारतीय दुतावासासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे दुतावासासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शीख तरुण निदर्शने करत आहेत. त्यामुळे हा सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
लंडनमधल्या काही खालिस्तान समर्थक संघटनांनी भारत विरोधी घोषणाही दिल्याने वाद निर्माण झाला होता. लंडनमध्ये शीख समुदायाचं प्रमाण मोठं आहे. त्यात काही खालिस्तान समर्थक संघटना असून त्या कायम अशा प्रकारचं कृत्य करत असतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसही काळजी घेत आहेत.
या आधी कॅनडाच्या पंतप्रधानांनीही भारतातल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आक्षेप घेत भारताने हा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये उगाच नाक खुपसू नये, नाहीतर दोन्ही देशांचे संबंध बिघडतील असा इशाराही भारताने दिला होता.
संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षांनाही याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. शांततामय आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करू नये असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. काही लोक आणि संघटना जाणीवपूर्वक हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
#WATCH: London Police in full force giving protection to Indian High Commission while protestors raise anti-India slogans and some pro-farmer slogans. pic.twitter.com/AfFbZdhLbX
— ANI (@ANI) December 6, 2020
आत्तापर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांच्या विविध संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. आता आणि चर्चा होणार असून त्यात मार्गे काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे.