लंडनचा हॅवलॉक रोड होणार गुरूनानक रोड!

लंडनचा हॅवलॉक रोड होणार गुरूनानक रोड!

लंडनमधील हॅवलॉक रोड (Havelock Road London) लवकरच गुरूनानक (Gurunanak Road) रोड म्हणून ओळखला जाणार आहे.

  • Share this:

लंडन, 1 डिसेंबर : लंडनमधील हॅवलॉक रोड (Havelock Road London) लवकरच गुरूनानक (Gurunanak Road) रोड म्हणून ओळखला जाणार आहे. लंडनमधील साउथहॉल भागात भारतीयांची वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागाला ‘लिटिल इंडिया’ म्हणूनही ओळखतात. या भागातील दुकानदार, व्यापारी यांची मतं आणि सार्वमत जाणून घेतल्यानंतर स्थानिक प्रशासनानी (इलिंग काउन्सिल) हा निर्णय घेतला असल्याचं या काउन्सिलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. नाव बदलण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन नाव 2021 मध्ये अंमलात येईल.

सध्या या रस्त्याचे नाव हेन्री हॅवलॉक यांच्या नावावर आहे. ब्रिटीशांच्या राजवटीविरूद्ध भारतातील 1857 च्या उठावाला दडपण्यात ब्रिटिश जनरल हेन्री हॅवलॉकची महत्त्वाची भूमिका होती. लंडनमधील सर्वांत मोठा गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा याच रस्त्यावर आहे.

या रस्त्याला नाव पुढील वर्षी देण्यात येणार आहे. पण 30 तारखेला गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर याची घोषणा करण्यात आली आहे. लंडनच्या साऊथहॉलमधील हॅवलॉक रोड परिसरात शिखांची लोकसंख्या मोठी आहे. स्थानिकांच्या भावनेचा आदर राखत हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये अमेरिकेत उसळलेल्या 'Black Lives Matter’ या कॅम्पेननंतर लंडन आणि ब्रिटनमधील सार्वजनिक ठिकाणांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यातून हॅवलॉक रस्त्याचं नाव बदलण्याची कल्पना समोर आली होती. यासाठी लंडनमधील नागरिकांचे मत देखील विचारात घेण्यात आले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, त्या स्थानाचे नाव बदलण्यासाठी स्थानिक लोक, व्यवसायिक आणि इतर समाज घटकांचादेखील सल्ला घेण्यात आला आहे.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाच्या नाव बदलाचा प्रस्ताव आल्यानंतर 'सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख, संवेदनशीलता आणि वारसा यांचा आदर राखला जाईल. तसंच समजात समतोल राखला जाईल, याचा विचार आम्ही स्ट्रीट नेमिंग प्रोटोकॉलचा वापर करताना करतो, असं इलिंग काउन्सिलने स्पष्ट केलं आहे. इलिंग साउथॉलचे मजूर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा म्हणाले, ‘अखेर हॅवलॉक रोडचं नाव बदलण्याच्या इलिंग काउन्सिलने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. ब्रिटिशांच्या वसाहतींच द्योतक असलेल्या अनेक खाणाखुणा इथं आहेत. इलिंग साउथहॉलचा खासदार आणि त्यापूर्वी 25 वर्षे नगरसेवक म्हणून काम करतानाही मला या ब्रिटिश साम्राज्यवादी खुणांची लाज वाटायची. या निर्णयामुळे सार्वजनिक नावांतून वसाहतवादाचा प्रभाव दूर होणार आहे.’ हा बदल कौतुकास्पद असल्याचं अनेकांनी ट्विट करून म्हटलंय. गुरूनानक जयंतीदिनी ही घोषणा केल्याचाही अनेकांना आनंद झाला आहे.

Published by: Shreyas
First published: December 1, 2020, 4:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या