लंडनमधल्या दहशतवादी हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू, 3 हल्लेखोरांचा खात्मा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2017 12:07 PM IST

लंडनमधल्या दहशतवादी हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू, 3 हल्लेखोरांचा खात्मा

04 जून : लंडनमध्ये शनिवारी रात्री दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन हल्लेखोरांचा खात्मा झाला आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा कॉल येताच अवघ्या आठ मिनिटांमध्ये कारवाई करत पोलिसांनी या हल्लेखोरांना ठार केलं आहे.

शनिवारी रात्री हल्लेखोरांनी लंडन ब्रीजवर भरधाव गाडी चालवून पादचारी मार्गावरील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी  बरो मार्केटमध्ये जाऊन नागरिकांवर चाकूहल्ला केला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.

ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं जाहीर केलं आहे. या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाले असून जखमींना शहरातील तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.  लंडनमधील भुयारी रेल्वे स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. तसंच, लंडन ब्रीज आणि बरो मार्केट रिकामे करण्यात आले असून, तेथे मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील मॅंचेस्टरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर परत हा हल्ला झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Loading...

या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या तपासात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...