Home /News /videsh /

लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख : पाहा आहे काय प्रकरण

लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख : पाहा आहे काय प्रकरण

आली लहर केला कहर! Corona काळात Unlock ची प्रक्रिया सुरू झालेली असली, तरी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, हे काही लोक आता विसरले आहेत.

    मेलबर्न 10 सप्टेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात जगभरात सगळीकडे Unlock ची प्रक्रिया सुरू झालेली असली, तरी अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, हे काही लोक आता विसरले आहेत. अशाच एका महिलेला हे विसरल्याची काय शिक्षा मिळाली ते वाचा. Corona काळात स्वतःबरोबर इतरांची देखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे. एकीकडे भीतीमुळे लोक बाहेरचे पदार्थ खाण्यास घाबरत आहेत, तर दुसरीकडे काही लोक मात्र नियमांच सर्रास उल्लंघन करून मजा करताना दिसू लागले आहेत. आपल्याकडेच नव्हे, तर ऑस्ट्रेलियात अशीच एक घटना घडली. पण तिथल्या जागरूक पोलिसांनी काय केलं हे महत्त्वाचं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महिलेची गोष्ट व्हायरल होत असून यामध्ये या महिलेने लॉकडाऊनचे नियम तोडत आपला आवडता पदार्थ खाण्यासाठी 75 किलोमीटरचा प्रवास केला. इव्हिनिंग स्टँडर्डने दिलेल्या बातमीनुसार, ही महिला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील असून पोलिसांनी तिला यासाठी जबर दंड देखील ठोठावला आहे. 7 सप्टेंबर रोजी ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र वाटेत ती कबाब घेण्यासाठी थांबली असताना पोलिसांनी तिला पकडले. यावेळी लॉकडाऊन असताना देखील ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी घराच्या बाहेर पडल्यामुळे पोलिसांनी तिला $1,652 म्हणजेच जवळपास 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना मेलबर्न शहरामध्ये देखील रात्रीचे 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आणखी अनेक नागरिकांवर याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यामध्ये अनेक विचित्र लोक अडकत आहेत. एका महिलेला रात्री 2 वाजता आईस्क्रीम खायची लहर आली. ती त्यासाठी बाहेर पडली तेव्हा पोलिसांनी पकडलं. एका व्यक्तीला आपल्या पार्टनरला रात्री भेटायला गेल्यामुळे दंड ठोठावण्यात आला होता. आतापर्यंत पोलिसांनी 171 जणांवर या प्रकरणी कारवाई केली असून यामध्ये 31 जणांना मास्क न घातल्याबाबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे तर 67 जणांना कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर या महिलेप्रमाणेच पोलिसांनी मागील महिन्यात एका व्यक्तीला देखील अशाचप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला होता. या व्यक्तीने देखील आपले आवडते बटर चिकन खाण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला सव्वा लाखांचा बांबू बसला.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या