26 डिसेंबर : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादमध्ये गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने जी वागणूक दिली त्यावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलेलं नाही असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केला.
कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीने काल त्यांची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात भेट घेतली होती. भेटीच्या वेळी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला मंगळसुत्र, बांगड्या काढण्यास सांगण्यात आल्या. त्याचबरोबर कुंकू लावण्याची परवानगीही देण्यात आली नाही. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला त्यांची मातृभाषा मराठीत बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. या दोघींनाही बोलण्यास माध्यमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी अट भारतानं घातली होती मात्र पाक माध्यमांनी या दोघींचाही विविध प्रश्न विचारून छळ केल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीमधील एका खोलीत झालेली ही भेट म्हणजे एका परीने तोंडदेखला सोपस्कार ठरला. कारण जाधव यांना पत्नी व आईला प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. एका काचेच्या तावदानाआडून इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांना परस्परांशी संवाद साधता आला. काचेतून ते एकमेकांना पाहू शकत होते. परंतु जाधव यांना ज्या खोलीत बसविले होते ती काचेच्या तावदानाच्या पार्टिशनने सीलबंद केलेली होती. त्यामुळे बोलणे व ऐकणे फक्त इंटरकॉमवरूनच शक्य होते.
बलुचिस्तान प्रांतात गुप्तहेर आणि दहशतवादी हालचाली करण्यावरच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती. तर त्यांचा या साऱ्याशी काही संबंध नसून ते इराणमध्ये व्यापार करत होते अशी भारताची भूमिका आहे . पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. हा खटला आता आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा