Home /News /videsh /

किम जोंग वापरतायत बॉडी डबल? जुन्या आणि नव्या व्हायरल PHOTO मध्ये आहेत 'हे' फरक

किम जोंग वापरतायत बॉडी डबल? जुन्या आणि नव्या व्हायरल PHOTO मध्ये आहेत 'हे' फरक

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे 20 दिवस कुठेच दिसले नव्हते. आता किम जोंग यांचा जुना फोटो आणि नव्या व्हिडिओतील व्यक्ती यांच्यात फरक दिसत असल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    प्‍योंगयांग, 06 मे : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्याबाबतचं गूढ अजुनही संपलेलं नाही. जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला असताना किम जोंग 20 दिवस लोकांसमोर आले नव्हते. त्यानंतर 2 मे रोजी त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आल्यानंतर किम यांच्या तब्येतीबाबत सुरु असलेल्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र पुन्हा त्यांच्या जुन्या आणि नव्या फोटोंवरून वेगळाच तर्क लढवला जात आहे. काही वृत्तसंस्थांच्या मते किम जोंग यांचा जो व्हिडिओ समोर आला त्यामध्ये बॉडी डबलचा (हुबेहुब त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती) वापर करण्यात आला होता. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले. पण ते किम जोंग नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती होती, असे म्हटले जात आहे. उत्तर कोरियाच्या माध्यमांनी 1 मे रोजी किम जोंग हे एका खताच्या कारखान्याचं उद्घाटन करत असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला होता. कारखान्याची पाहणी करतानाच्या व्हिडिओमध्ये किम यांची प्रकृती व्यवस्थित दिसत आहे. किम जगासमोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर पुन्हा वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यात किम जोंग नाही तर त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती समोर आल्याचं म्हटलं आहे. जगात याआधीही अनेक हुकूमशहांनी बॉडी डबलचा वापर केला आहे. यामध्ये हिटलर, स्टॅलीन आणि सद्दाम हुसेन यांचाही समावेश आहे. त्यामुळे किम जोंग यांच्याबद्दलही हाच तर्क लावला जात आहे. दरम्यान, ब्रिटनच्या एका माजी खासदाराने असा दावा केला आहे की, व्हिडिओत खरे किम जोंग नाहीत. कारण त्या व्यक्तीच्या दातामध्ये आणि चेहऱ्यात फरक आहे. किम जोंग यांचा जुना फोटो आणि व्हिडिओतील व्यक्ती यांच्यात फरक स्पष्ट दिसतो असंही त्यांनी म्हटलं आहे. ट्विटरवर आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये किम यांच्या 1 मे च्या व्हिडिओबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यात किम यांचे जुन्या फोटोत दिसणारे दात आणि सध्याच्या फोटोतील दात यांच्यात फरक असल्याचं म्हटलं आहे. तसंच डोळे आणि केसही वेगळे दिसत आहे. तर किम यांच्या मागे सावलीसारखी असणारी त्यांची बहीण किम यो जोंग यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. यामुळे किम यांच्याबाबत शंका घ्यायला वाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल होणारे फोटो आणि त्यात केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे किम जोंग उन यांच्याबद्दलचं गूढ वाढतच चाललं आहे. किम यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची माहितीही अत्यंत गोपनिय अशी ठेवण्यात आली आहे. त्यातच 20 दिवसानंतर अचानक जगासमोर आल्यानं किम यांच्याबाबत प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. हे वाचा : चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Kim jong un

    पुढील बातम्या