Home /News /videsh /

अमेरिकेतले हिंदू भडकले! कमला हॅरिस दुर्गेच्या रूपात ट्रम्परूपी राक्षसाचा वध करतानाचं चित्र वादात

अमेरिकेतले हिंदू भडकले! कमला हॅरिस दुर्गेच्या रूपात ट्रम्परूपी राक्षसाचा वध करतानाचं चित्र वादात

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत (US Presidential election 2020) उपाध्यक्षपदासाठी शर्यतीत असणाऱ्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रामुळे खळबळ उडाली आहे. अनेक हिंदू संस्थांनी आक्रमकपणे याचा निषेध नोंदवला आहे.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू असताना कमला हॅरिस या भारतीय वंशीय नेत्या उपराष्ट्राध्यपदाच्या शर्यतीत आहे. पण आता त्यांच्या भाचीने केलेल्या एका Tweet ने त्यांनी अमेरिकन हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे. जो बायडेनरूपी सिंहावर आरूढ होऊन ट्रम्परूपी राक्षसाचा वध करताना दुर्गेच्या रूपात कमला हॅरिस यांना दाखवणारं एक चित्र अमेरिकेत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मीना हॅरिस या कमला हॅरिस यांच्या 35 वर्षीय भाचीने केलेल्या एका Tweet वरून वादंग माजला आहे. हिंदूंनी तीव्र शब्दांत याविरोधात भावना व्यक्त केल्यानंतर लगेच मीना यांनी हे Tweet डिलिट केलं. पण तरीही अमेरिकेसह जगभर आता माता दुर्गेच्या अवतारातल्या कमला हॅरिस यांची प्रतिमा पोहोचली आहे. मीना हॅरिस या वकील आहेत. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तकंही लिहिली आहेत. फेनॉमेनल वुमन अॅक्शन कँपेन नावाच्या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. त्यांनी आपली मावशी आणि सिनेटर मीना हॅरिस यांच्या प्रचारार्थ एक ट्वीट केलं आणि तेच त्यांच्य अंगाशी आलं. कमला हॅरिस यांना दुर्गेच्या रूपात दाखवणारं एक चित्र त्यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून शेअर केलं. "दुर्गा मातेच्या चेहऱ्यावर कमला यांचा फोटो सुपरइम्पोज केल्यामुळे अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत", अशी प्रतिक्रिया हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे सुहाग शुक्ला यांनी नोंदवली आहे. ही संस्था अमेरिकेतल्या हिंदू धर्मीयांचं प्रतिनिधित्व करते, असं मानलं जातं. हिंदू देव-देवतांच्या प्रतिमा व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यावर या संस्थेने काही गाइडलाइन्स यापूर्वीही दिल्या होत्या. कमला हॅरिस यांच्या दुर्गा रूपातल्या चित्रावर अनेक हिंदूंनी आक्षेप घेतला आहे. मीना यांनी हे चित्र तातडीने ट्विटरवरून काढून टाकलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षानेही या चित्राचा संबंध नाकारला आहे. ते मीना हॅरिस यांनी तयार केलेलं नाही. त्यांनी फक्त ते शेअर केलं असल्याचं आता सांगितलं जात आहे. हिंदू अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या रिशी भुतडा यांनीही हे आक्षेपार्ह चित्र मीना हॅरिस यांनी शेअर करण्यापूर्वी Whatsapp आणि इतर माध्यमातून फिरत असल्याचं मान्य केलं. Tweet काढून टाकलं असलं तरीही मीना हॅरिस यांनी माफी मागितली पाहिजे. कारण आमच्या धर्मातली श्रद्धास्थानं अशा प्रकारे राजकीय कारणासाठी अमेरिकेत वापरली जाणं योग्य नाही. आमच्या धर्माचा हा अवमान आहे. हिंदूंच्या भावना दुखावणारं आहे, असं निवेदन अमेरिकन हिंदूज अगेन्स्ट डिफमेशन नावाच्या संस्थेतर्फेही देण्यात आलं आहे. आता मीना हॅरिस यांच्यावरचा दबाव वाढत आहे. त्यांनी जाहीरपणे हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी होत आहे. जगभरातल्या अनेक हिंदू संस्थांनी अमेरिकन हिंदूंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Donald Trump, US elections

    पुढील बातम्या