काबुल, 1 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अमेरिकी फौजांशी (US troops) सामना करून अखेर पुन्हा पवित्र भूमी जिंकून घेतल्याबद्दल दहशतवादी संघटना अल् कायदाकडून तालिबानचं (Taliban) अभिनंदन करण्यात आलं आहे. मुस्लिम जगतासाठी तालिबानची कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून जगातील अनेक देशांना यातून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू शकेल, असं अल् कायदानं पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेला (America) हाकलून लावल्याबद्दल तालिबानचं अभिनंदन करतानाच आता काश्मीरची (Kashmir) पाळी असल्याचं अल कायदानं (Al quida) म्हटलं आहे.
अल कायदाचा संदेश
पवित्र मुस्लीम भूमीची अमेरिकेच्या तावडीतून अल्लाहच्या कृपेनं मुक्तता झाली असून जिहाद हाच यासाठीचा योग्य मार्ग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं अल कायदानं म्हटलं आहे. आता तालिबाननं आपली ताकद वापरून इतर ठिकाणच्या मुस्लिम भूमीवर झालेलं अतिक्रमण दूर करून पवित्र कार्याला साथ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये काश्मीर, फिलिस्तान, सोमालिया आणि येमेन यासारख्या ठिकाणच्या संघर्षात तालिबानने इस्लामच्या बाजूने आपली ताकद उभी करावी आणि हा प्रदेश इस्लामविरोधी शक्तींच्या ताब्यातून सोडवण्यास मदत करावी, अशी मागणी अल कायदाने केली आहे.
अफगाणिस्तानची भूमी ही पाश्चात्यांसाठी नेहमीच एक दफनभूमी असेल, असं सांगताना अमेरिकेला ज्या लाजीरवाण्या पद्धतीनं माघार घ्यावी लागली, ते पाहता इतर मुस्लीम देशांनाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळेल, असं या संदेशात म्हटलं आहे. तालिबाननं आतापर्यंत तीन वेळा साम्राज्यवादी शक्तींना धडा शिकवला असल्याचं सांगत हे काम पुढेही सुरुही ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
भारताचे अगोदर व्यक्त केली होती चिंता
भारत आणि तालिबानमध्ये मंगळवारी पार पडलेल्या औपचारिक बैठकीत भारताने सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं होतं. अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात वापर होणार नाही, असं आश्वासन देण्याची मागणी भारताने तालिबानकडं केली होती. तालिबाननं याला सकारात्मकता दर्शवली असली, तरी तालिबानचा इतिहास लक्षात घेता, भारतासमोरचं आव्हान भविष्यात वाढणार आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.