भारतीय लष्कराच्या हिममानवाचा दावा फोल? नेपाळनं सांगितलं सत्य

भारतीय लष्करानं ट्वीट करुन प्रसिद्ध केलेल्या हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फावरच्या या ठशांनी हिममानवाचं गूढ चर्चेत आलं होतं. त्यावर नेपाळ सरकार खुलासा करत ते हिममानव नसून जंगली अस्वल असल्याचं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 10:00 PM IST

भारतीय लष्कराच्या हिममानवाचा दावा फोल? नेपाळनं सांगितलं सत्य

नवी दिल्ली, 02 मे: 'भारतीय लष्करानं ज्याबाबत शक्यता व्यक्त केली होती, तो हिममानव नव्हे, तर जंगली अस्वल होतं', असा खुलासा नेपाळच्या लष्करानं केला आहे. भारतीय लष्करानं ट्वीट करुन प्रसिद्ध केलेल्या हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फावरच्या या ठशांनी हिममानवाचं गूढ चर्चेत आलं होतं. त्यावर नेपाळ सरकार खुलासा करत ते हिममानव नसून जंगली अस्वल असल्याचं म्हटलं आहे.

भारतीय लष्करानं ट्विट केलेले फोटो हिममानवाचे असावेत असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे इतिहासाच्या पानातलं हिममानवाचं रहस्य पुन्हा वर्तमान बनून समोर आलं होतं. हिममानवाचा हा विषय प्रचंड चर्चेत आला होता. त्यावर नेपाळने हे खोटं असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे नेपाळचं म्हणणं...

'भारतीय लष्कराचे जवान जेव्हा त्या मोहिमेवर होते. तेव्हा आमचेही अधिकारी त्यांच्यासोबत होते. आम्ही आधीपासून सांगत होतो की ते जंगली अस्वलच आहे. पण स्थानिकांनी वावड्या उठवल्या की त्या पाऊलखुणा हिममानवाच्या आहेत', असं नेपाळ लष्करानं म्हटलं आहे.

हिममानव की जंगली अस्वल

हिममानव... यती... स्नो मॅन... अशा वेगवेगळ्या नावांचं गूढ मानवाला कायम खुणावत राहिलं. ज्याच्या अस्तित्वाबद्दल गेली अनेक वर्ष वाद आहे. अशा हिमममानवाचे भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्पजवळ पायांचे काही ठसे आढळून आले. या ठशांच्या आकारमुळे पुन्हा एकदा हिममानवाच्या अस्तित्वाबद्दल चर्चा सुरू झाली. हे ठसे जवळपास 32 x 15 इंच इतके मोठे आहेत.

भारतीय सैन्यानं ट्विटमध्ये म्हटलंकी, 'पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या गिर्यारोहण मोहीम पथकाला पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेला पशू येतीच्या पावलांच्या ठसे निदर्शनास पडले आहेत.  9 एप्रिल 2019 रोजी मकालू बेस कँपजवळ हे ठसे पाहिले गेले. यापूर्वीही मकालूबरुआ राष्ट्रीय उद्यानाजवळच असे ठसे आढळले होते. पण संशोधकांना हे ठसे हिममानवाचे असल्याचा दावा पटत नाही.

दोन पायांवर चालणारा केसाळ, उंच, अवाढव्य वानर असं यतीचं वर्णन केलं जातं. तो मानवाचा पूर्वज मानला जातो. परदेशात यतीवर अनेक सिनेमे बनवण्यात आलेत. अशाच सिनेमांमध्ये दाखवलेलं हे काल्पनिक चित्रण आम्ही तुम्हाला दाखवतो. खरंतर हिममानवाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. हिममानवाच्या अस्तित्वाच्या गूढ रहस्याचा मोठा इतिहास आहे.

हेही वाचा : आईसोबतच्या लैगिंक संबंधाने मुलाचा उद्रेक, डीएसपीला घातल्या गोळ्या

यतीच्या गूढ रहस्याचा इतिहास

1832 साली पहिल्यांदा एका गिर्यारोहकानं उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणारं महाकाय वानर पाहिल्याचा दावा केला. मकालू बारून नॅशनल पार्कच्या याच परिसरात पूर्वीही हिममानवाचं ओझरतं दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला होता. लडाखच्या काही बौद्ध भिक्खूंनीही हिममानव पाहिल्याचा दावा केला होता.

1920 च्या दशकापासून हिमालयामध्ये भटकंतीसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांनाही यती शोधण्याचा प्रयत्न केला.

काही वेळेस त्याच्या पावलांचे ठसे, केस सापडल्याचं सांगितलं गेलं. हिमलायाच्या कुशीत राहणाऱ्या अनेकांनी यती पाहिल्याचा दावा केला, पण कोणालाही ठोस पुरावा देता आला नाही. त्यामुळेच वैज्ञानिक हिममानव म्हणजे एक दंतकथा असल्याचं मानतात. काहीजणांच्या मते ती बर्फाळ प्रदेशात आढळणारी अस्वलांचीच एक जमात आहे.

हिममानव म्हणजे काय ?

- येती हा शेरपा भाषेतील शब्द

- येह आणि तेह शब्दांपासून 'येती' शब्द

- येह म्हणजे डोंगर

- तेह म्हणजे जीव

- येतीचा अर्थ डोंगरात राहणारा जीव

हिममानवाची वेगवेगळी नावं

भारतात - हिममानव

नेपाळमध्ये - यती

अमेरिकेत - बिगफुट

ब्राझीलमध्ये - मपिंगुरे

ऑस्ट्रेलियात - योवेई

इंडोनेशियात - साजारंग गीगी या नावांनी ओळखलं जातं.

वेगवेगळ्या नावामागचं त्या रहस्यमयी प्राण्याचं गूढ मानवाला अजून उकललं नाही. नव्यानं समोर आलेल्या पाऊलखुणांनी मानवाची जिज्ञासा पुन्हा जागी झाली आहे. सृष्टीचे अनेक गूढ उकलणारा माणूस हिममानवाचं गूढ उकलणार की ते तसंच कायम राहाणार हा खरा प्रश्न आहे.


प्रियांका गांधींनी खरंच मुलांना मोदींबाबत 'तशा' घोषणा देण्याचं सांगितलं का? हाच तो VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 09:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close