Home /News /videsh /

'अमेरिकेनं 52 ची धमकी देण्यापूर्वी 290 आकडा लक्षात ठेवावा', इराणच्या राष्ट्रपतींचा इशारा

'अमेरिकेनं 52 ची धमकी देण्यापूर्वी 290 आकडा लक्षात ठेवावा', इराणच्या राष्ट्रपतींचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील 52 ठिकाणं आमच्या निशाण्यावर असल्याचा इशारा दिला होता. आता त्यावर इराणच्या राष्ट्रपतींनी उत्तर दिलं आहे.

    तेहरान, 07 जानेवारी : अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या दिल्या जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देताना म्हटलं की, इराणकडे कधीच अण्वस्त्र नसेल. ट्रम्प यांनी हे वक्तव्य इराणने 2015 च्या अण्वस्त्र कराराच्या निर्बंधाचे पालन करणार नसल्याचे सांगितल्यानंतर केले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनीही प्रत्युत्तर देताना सांगितलं की, आम्हाला धमकी देऊ नका. रूहानी यांनी 52 च्या बदल्यात 290 ची आठवणही करून दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटरवरून म्हटलं की, इराणजवळ अण्वस्त्र नसेल. ट्रम्प यांनी 2015 मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या अण्वस्त्र करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देताना म्हटलं की, 'इराणला कधीही धमकी देऊ नका. जे 52 आकडा सांगत आहेत त्यांनी 290 सुद्धा लक्षात ठेवायला हवा.' डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 52 ठिकाणांवर हल्ला करू असं म्हटलं होतं. त्याबदल्यात रूहानी यांनी जुलै 1988 च्या घटनेची आठवण करून दिली. अमेरिकेने इराणच्या प्रवाशी विमानावर हल्ला केला होता. यामध्ये 290 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंतोनियो गुतेरेस यांनी जागतिक तणावाच्या काळात अधिक संयम बाळगा असं आवाहन केलं आहे. नवं वर्ष जगात मोठी खळबळ उडवून देणारं ठरलं. सध्या कठिण काळातून आपण जात आहे. तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अशांत वातावरण निर्माण झालं असल्याचंही ते म्हणाले. VIDEO अमरिकेचा बदला कोण घेणार? सुलेमानिंच्या मुलीचा इराणच्या राष्ट्रपतींना सवाल इराणचा टॉप कमांडर सुलेमानी आणि भारताचं 'असं' होतं कनेक्शन
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: America, Iran

    पुढील बातम्या