तेहेरान 29 जून: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या अटकेचं वॉरंट निघालं आहे. अमेरिकेचा क्रमांक एक चा शत्रू असलेल्या इराणने हे अटक वॉरंट (Iran Arrest Warrant) काढलं आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी (Gen. Qassem Soleimani) 3 जानेवारीला ठार झाला होता. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हा हल्ला केला होता. या हल्ल्याला अध्यक्ष ट्रम्प आणि इतर 30 अधिकारी जबाबदार असून त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरावा अशी मागणी इराणने इंटरपोलकडे (Interpol) केली आहे. इराणच्या सरकारी टीव्हीवर हे वृत्त देण्यात आलं आहे.
इराणच्या या मागणीचा काहीही परिणाम होण्याची शक्यता नसून इंटरपोलने त्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अमेरिका आणि इराणदरम्यानचा तणाव यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
सुलेमानी हा इराकमध्ये असलेल्या अमेरिकन सैन्यावरच्या हल्ल्याला जबाबदार आहे असा आरोप अमेरिकेने केला होता. सुलेमानी ठार झाल्यामुळे इराणला जबर हादरा बसला होता.
कसा ठार झाला सुलेमानी?
सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात होता नेमका त्याच वेळी अमेरिकेनं ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ला केला. यात सुलेमानी ठार झाला. त्या हल्ल्याचा थरारक VIDEOही बाहेर आला होता. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी सुलेमानी ज्या ठिकाणी होता नेमका त्याच ठिकाणचा वेध घेतल्याचं त्यात स्पष्टपणे दिसून येतं होतं. अमेरिकेने इराकमधल्या आपल्या तळावरून क्षेपणास्त्र डागलं आणि त्याने नेमका सुलेमानीचा वेध घेतल्याचं त्या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय.
हे वाचा - भारतासोबतच्या तणावात चीनला मोठा फटका; महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला
या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाला होता. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्याने सिरियामध्ये जाळं पसरवलं होतं तसंच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचाही आरोप त्याच्यावर होता. अमेरिका त्याच्या मागावर होती.
हे वाचा - अमेरिकेत ही कंपनी करतेय कोरोनावरच्या औषधाची अंतिम चाचणी, 4 महिन्यांत लस बाजारात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेच्या झेंड्याचा फोटो ट्विट केला होता. गेल्या वर्षीपासून इराण-अमेरिका संघर्ष वाढला होता. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातले आहेत.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump, Iran