युद्धाचा भडका! अमेरिकन लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

युद्धाचा भडका! अमेरिकन लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

अमेरिकेच्या इराकमधील दोन लष्करी तळांवर इराणने 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. यामध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

तेहरान, 08 जानेवारी : इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षाची वाटचाल युद्धाच्या दिशेने चालली आहे. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे. यामध्ये जिवितहानी किती झाली हे समजू शकले नाही.

इराणने मध्यरात्री हल्ला केल्यानंतर काही वेळाने पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करणं सुरुच असल्याचे वृत्त अल जझीराने दिले आहे. सुरुवातीला केलेल्या 12 क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर तासाभराने पुन्हा क्षेपणास्त्र डागण्यास इराणने सुरुवात केली.

इराणच्या टॉप कमांडरला ठार केल्यानंतर अमेरिकेनं आणखी एक हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसात इराणकडून अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला करण्यात आला. याच दरम्यान इराणने मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धच पुकारलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने काही पावलं उचलली तर त्यांची 52 ठिकाणं आमच्या निशाण्यावर असून ती उद्ध्वस्त करू असा इशारा दिला आहे.

सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प यांच्यावर इनाम

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत अमेरिका आणि इराणकडून हल्ले झाले आहेत. इराणने कमांडर सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेऊ असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनंसुद्धा आता कोणत्याही प्रकारची आगळीक खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. कासिम सुलेमानी याच्यावर अंत्यसंस्कारावेली इराणच्या एका संस्थेनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद कऱणाऱ्यास 80 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 576 कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले आहे.

इराण-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंतोनियो गुतेरेस यांनी जागतिक तणावाच्या काळात अधिक संयम बाळगा असं आवाहन केलं आहे. नवं वर्ष जगात मोठी खळबळ उडवून देणारं ठरलं. सध्या कठिण काळातून आपण जात आहे. तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अशांत वातावरण निर्माण झालं असल्याचंही संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

वाचा : कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, 35 लोकांचा मृत्यू तर 48 गंभीर जखमी

Published by: Suraj Yadav
First published: January 8, 2020, 6:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading