आयर्लंडमध्ये दोन चिमुकल्यांसह भारतीय महिलेचा निर्घृण खून; 5 दिवस घरात पडून होते मृतदेह

आयर्लंडमध्ये दोन चिमुकल्यांसह भारतीय महिलेचा निर्घृण खून; 5 दिवस घरात पडून होते मृतदेह

सीमा बानू यांचं 13 वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न झालं होतं. काही महिन्यांपूर्वीच आयर्लंडला परत गेल्या होत्या. त्यापूर्वी पतीशी फारसं पटत नसल्याने त्या भारतात परत आल्या होत्या.

  • Share this:

डब्लिन, 31 ऑक्टोबर : काही महिन्यांपूर्वीच आयर्लंडला स्थायिक झालेल्या एका कुटुंबाचा भीषण अंत झाला आहे. दक्षिण डब्लिन शहराच्या एका छोट्या उपनगरात राहणाऱ्या 37 वर्षांच्या भारतीय महिलेला तिच्या दोन लहान मुलांसह निर्घृणपणे ठार मारल्याची घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. भारतीय दूतावासानेही या घटनेची गंभीर दखल घेत धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

मूळच्या कर्नाटकातल्या म्हैसूर इथल्या रहिवासी असणाऱ्या सीमा बानू सैयद यांचा आणि 11 वर्षांची मुलगी असिफा रिझा आणि 6 वर्षांचा मुलगा फैझान सैद यांच्यासह निर्घृण खून झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. पाच दिवस या तिघांचे मृतदेह घरातच पडून होते. खून नेमका कुणी आणि का केला यासंदर्भात अद्याप काहीच ठोस माहिती मिळालेली नाही.आयरिश टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस सीमा बानू यांच्या घरात गेले आणि तिथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलीस शेजारच्या घरांमध्ये कसून चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही फूटेजसुद्धा तपासलं जाणार आहे.

डेक्कन हेरॉल्डने दिलेल्या बातमीनुसार, सीमा बानू काही महिन्यांपूर्वीच आयर्लंडला गेल्या होत्या. पतीशी फारसं पटत नसल्याने त्या भारतात परत आल्या होत्या. 13 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न समीर सैद या सॉफ्टवेअर इंजिनिअरशी झालं होतं. सुरुवातीला दुबई आणि त्यानंतर त्या पतीसह आयर्लंडला स्थायिक झाल्या होत्या. ही घटना घडली तेव्हा नवरा दुसऱ्या शहरात असल्याचं सांगितलं जातं. पण सीमा यांच्या भारतातल्या कुटुंबीयांनी सीमाचं पतीशी पटत नसल्याने आणि मालमत्तेवरून वाद सुरू असल्याचं सांगितलं आहे. बानू यांनी समीर आपला खून करू शकतो, असं घरच्यांना सांगितलं होतं. कुटुंबीयांबरोबर 25 ऑक्टोबरला त्यांचा शेवटचा video call झाला होता. त्यानंतर सीमा यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. सीमा बानू यांच्या शेजाऱ्यांनी चार-पाच दिवसात घरातलं कुणी दिसलं नसल्याचं पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला त्या वेळी सीमा यांचा मृतदेह एका बेडरूममध्ये आणि दुसऱ्या बेडरूममध्ये मुलांचे मृतदेह आढळले. त्यांच्या मानेवर कशानेतरी गळा आवळल्याच्या खुणा होत्या. सीमा यांचाही गळा दाबून खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. हल्लेखोराने घरातला नळ सुरू ठेवला होता. त्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालं होतं.

आयरिश पोलीस जे गर्डाय (gardaí ) नावाने ओळखले जातात, पुढील तपास करत आहेत. दरम्यान भारतीय दूतावासाकडे सीमा यांच्या भारतातील कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात मिळवण्याविषयी विनंती केल्याचं समजते.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 31, 2020, 10:41 PM IST
Tags: Irland

ताज्या बातम्या