Home /News /videsh /

'अहम् गौरव शर्मा...', न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय वंशाच्या खासदाराने संस्कृतमध्ये घेतली शपथ

'अहम् गौरव शर्मा...', न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय वंशाच्या खासदाराने संस्कृतमध्ये घेतली शपथ

भारतीय वंशाचे डॉ. गौरव शर्मा (Dr Gaurav Sharma) यांनी बुधवारी न्यूझीलंडच्या संसदेत खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे डॉ. शर्मा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली.

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: भारतीय वंशाचे डॉ. गौरव शर्मा (Dr Gaurav Sharma) यांनी बुधवारी न्यूझीलंडच्या संसदेत खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे डॉ. शर्मा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली. डॉ. शर्मा हे तरुण खासदार अवघ्या 33 वर्षांचे असून ते मूळचे हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) हमिरपूरमधील आहेत. डॉ. शर्मा हे लेबर्स पार्टीचे उमेदवार होते, त्यांनी पश्चिम हॅमिल्टन मतदारसंघामधून विजय मिळवला आहे. न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी (Muktesh Pardeshi) यांनी ट्वीटवरुन यासंदर्भातील माहिती दिली. शर्मा यांनी आधी न्यूझीलंडमधील माओरी भाषेत (Maori)आणि नंतर संस्कृतमध्ये (Sanskrit) शपथ घेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांशी असणारं त्यांचं खास नातं अधोरेखित केल्याचे ट्वीट परदेशी यांनी केलं आहे. डॉ. गौरव यांनी न्यूझीलंडमधील ऑकलँडमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं असून अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून त्यांनी एमबीए पूर्ण केलं आहे. सध्या ते हॅमिल्टनमध्ये आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. या पूर्वी त्यांनी न्यूझीलंड, स्पेन, अमेरिका, नेपाळ, व्हिएतनाम, मंगोलिया, स्वित्झर्लंड आणि भारतात सार्वजनिक आरोग्य, धोरण, औषधोपचार आणि इतर गोष्टींमध्ये सहभाग घेतला होता. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीयांचा त्यांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी दिली आहे. (हे वाचा-कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार मोदी सरकार, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा) हिंदीमधून शपथ घेण्याऐवजी तुम्ही संस्कृतमधून शपथ का घेतली असं डॉ. शर्मा यांना एका ट्विटर युजरने विचारलं. त्यावर उत्तर देताना शर्मा असं म्हणाले की, 'खरं तर मी विचार केला होता. मात्र त्यानंतर मी माझ्या मातृभाषेत म्हणजेच पहाडीमध्ये किंवा पंजाबीमध्ये शपथ घेण्याचा विचार केला. पण सर्वांना आनंदी ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळेच सर्व भारतीय भाषांना मान देण्यासाठी मी संस्कृतमधून शपथ घेतली'. दरम्यान भारतीय भाषेला जागतिक पातळीवर नेल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात येत आहेत. सोशल मीडियावर भारतातील अनेक युजर्सनी त्याचप्रमाणे न्यूझीलंडमधील युजर्सनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. शर्मा यांनी निवडणुकीमध्ये नॅशनल पार्टीच्या टीम मॅकिन्डोए यांचा पराभव केला. यापूर्वी देखील त्यांनी 2017 मध्येही निवडणूक लढवली होती. दरम्यान, पंतप्रधान जसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला होता. त्यामध्ये प्रियांका राधाकृष्णन (Priyanca Radhakrishnan) न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याआधी त्यांचे सर्व शिक्षण हे सिंगापूरमध्ये झाले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: New zealand

    पुढील बातम्या