लॉसएंजलीस 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी पुढे आलीय. लॉसएंजलीसमध्ये एका भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आलीय. मनिंदरसिंग साही असं त्या नागरिकाचं नाव असून पंजाबमधल्या कर्नाल इथला तो राहणारा आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो अमेरिकेत आला होता. अमेरिकेने त्याला राजकीय आश्रय दिला होता. 31 वर्षांच्या मनिंदरसिंग हा विवाहित होता आणि त्याला 2 मुलंही आहेत. तो एका किराणा दुकानात काम करत होता. शनिवारी ही घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीय.
मनिंदरसिंग हा ज्या किराणा दुकानात काम करत होता त्या दुकानात हल्लेखार घुसला आणि त्याने गोळीबार केला. या गोळीबारात सिंग ठार झाला. हल्लेखोराने तोंडावर मास्क गुंडाळला होता. त्यामुळे तातडीने त्याची ओळख पटविता आली नाही. हा हल्लेखोर दुकानात शिरला आणि त्याने बेछुट गोळीबार केला.
सिंग हा घरातला एकमेव कमावता होता. दर महिन्याला बचत करून तो आपल्या बायको आणि मुलांसाठी पैसे पाठवत होता अशी माहिती अमेरिकेतल्या त्याच्या नातेवाईकांनी दिलीय. हल्लेखोरांकडे सेमी अॅटोमॅटिक बंदुक होती आणि तो चोरीच्या उद्देशाने दुकानात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
घटना घडली त्यावेळी दुकानात दोन ग्राहक होते. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संशयीताचा फोटोही प्रसिद्ध केलाय.
हेही वाचा...
ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला
'मायक्रोसॉफ्टशी भागीदारीसाठी आम्ही उत्सुक', मुकेश अंबानी-सत्या नडेला यांचा संवाद