व्हाईट हाऊसमध्ये पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर

व्हाईट हाऊसमध्ये पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर

"गेली साडेतीन वर्षं अमेरिकन जनतेशी खोटं बोलत असल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतोय का?" असं मूळच्या पुण्याच्या सध्या अमेरिकेत असणाऱ्या पत्रकाराने थेट डोनल्ड ट्रम्प यांना भर पत्रकार परिषदेत विचारलं.

  • Share this:

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका), 15 ऑगस्ट : पुणेरी खोचकपणाचे किस्से विनोदाने सगळीकडेच सांगितले जातात. पण काल अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांनाच एका पुणेरी थेट प्रश्नाने अवाक केलं. "गेली साडेतीन वर्षं अमेरिकन जनतेशी खोटं बोलत असल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतोय का?" असं थेट डोनल्ड ट्रम्प यांना एका पत्रकाराने भर पत्रकार परिषदेत विचारलं. त्यावेळी या प्रश्नाच्या टोकदार थेटपणामुळे आसपासचे सगळेच क्षणभर अवाक झाले. हा प्रश्न विचारणारे एस. व्ही. दाते मुळात पुण्यात जन्मलेले अमेरिकन पत्रकार आहेत.

एस. व्ही. किंवा शिरीष दाते हे हफिंग्टन पोस्टसाठी काम करतात. ते गेली तीन दशकं अमेरिकेत पत्रकार म्हणून वावरत आहेत. ते Huff post चे व्हाईट हाऊस कॉरस्पॉंडंट म्हणून या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एका भारतीय-अमेरिकी पत्रकाराने ट्रम्प यांना अवघड वाटणारा प्रश्न थेट विचारल्याने दाते यांच्या धैर्याचं कौतुक होत आहे.

शिरीष दाते यांनी पत्रकार परिषदेनंतर Tweet करून हा प्रश्न विचारण्यासाठी गेली 5 वर्ष वाट पाहात होतो, असंही लिहिलं आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याचसंदर्भात अधिक प्रश्न काल झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. अनेक पत्रकारांनी ट्रम्प यांना अडचणीचे वाटू शकतील, असे प्रश्न विचारले. पण दाते यांच्या थेट आणि निर्भिड प्रश्नाने अनेकांना अवाक केलं. दात्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी सुरुवातीला कळलं नाही, पुन्हा विचारा, असं म्हटलं. आणि दाते यांनी पुन्हा प्रश्न विचारल्यावरही ट्रम्प यांनी उत्तर द्यायचं टाळलं आणि ते सरळ दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.

कोण आहेत शिरीष दाते?

शिरीष दाते गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांच्याबद्दल मिळालेल्या ऑनलाईन माहितीमध्ये त्यांनी स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमधून उच्चशिक्षण घेतलं आहे आणि गेली बरीच वर्षं फ्लोरिडात राहून काम केल्यानंतर ते वॉशिंग्टन डीसीमध्ये आले आहेत. व्हाईट हाऊस कॉरस्पॉडंट म्हणून ते काम करतात. त्यांचा जन्म पुण्यात झाल्याचं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 15, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या