इस्लामाबाद, 10 डिसेंबर : पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची भीती आहे. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त संस्थांकडून मिळालेल्या संकेतांनुसार, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा एखादं धाडस करू शकतो. या पाकिस्तानी वृत्तपत्रात सेनेने दिलेल्या सुत्रांच्या हवाल्याने लिहिलंय की, सर्जिकल स्ट्राईकच्या शक्यतेमुळे पाकिस्तानने भारतीय सीमेवर सैनिकांना अलर्ट केलं आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिलंय की, 'भारताचं हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी सरकार देशात सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काहीही करू शकतं.'
एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रात असंही म्हटलंय की, 'अनेक विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलओसी आणि भारत-पाकिस्तान वर्किंग बॉउंड्रीवर पाकिस्तानी सैनिकांना हाय अलर्ट करण्यात आलं आहे, जेणेकरून भारताकडून कोणतंही धाडस करण्यात आल्यास त्याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकेल.'
पाकिस्तानमधील वृत्तपत्र जियो न्यूजनेही याबाबत वृत्त दिलं आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र जियो न्यूजने लिहिलंय की, 'पाकिस्तानने भारताच्या कोणत्याही फ्लॅग ऑपरेशन किंवा सर्जिकल स्ट्राईकच्या शक्यतेमुळे सेनेला अलर्टवर ठेवलं आहे. भारत आपल्या अंतर्गत आणि बाहेरील समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. अल्पसंख्याक, शेतकरी आंदोलन आणि काश्मीर मुद्दावरून भारतावर मोठा दबाव आहे. भारत लडाखमध्येही मोठ्या समस्यांचा सामना करत आहे.'
दरम्यान, पुलवामामध्ये आपल्या भारताच्या सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत, फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता.
पाकिस्तान, भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतही विधानं करत आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करत, 'मोदी सरकारला पंजाबच्या शेतकऱ्यांची कोणतीही काळजी नाही.' असं म्हटलं होतं.
Injustice anywhere is a threat to justice everywhere. We must speak up against injustice done to Punjabi farmers Modi policies are a threat to whole region. #FarmersProtest https://t.co/eemAteJMuv
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) December 7, 2020
फवाद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केवळ भारताच्या अंतर्गत बाबींवरच ट्विट केलं नाही, तर भारतीय शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न केलाय. 'गुजराती हिंदुत्व'ला दोष देत त्यांनी पंजाबी शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त केली असून पंजाबी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आजाव उठवला पाहिजे असंही म्हटलं आहे.