गेंड्याच्या शिकारीसाठी जाणं जीवावर बेतलं, हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे मृत्यू

गेंड्याच्या शिकारीसाठी जाणं जीवावर बेतलं, हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे मृत्यू

गेंड्यांच्या शिकारीसाठी (Rhino Poacher) गेलेल्या तिघांपैकी एकाचा हत्तीने (Elephant) पायदळी तुडवल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

गेंड्यांच्या शिकारीसाठी (Rhino Poacher) गेलेल्या तिघांपैकी एकाचा हत्तीने (Elephant) पायदळी तुडवल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) सर्वात मोठ्या अभयारण्यांपैकी एक असलेल्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये (Kruger National Park) शनिवारी (17 एप्रिल) ही घटना घडली.

क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे, हत्ती, सिंह (Lions), बिबटे (Leopards) आणि म्हशींचं (Buffaloes) राहण्याचं ठिकाण आहे. या पार्काच्या दक्षिणेकडील फाबेनी (Phabeni) भागात शनिवारी वनसंरक्षकांना तिघे जण दिसले होते. ते तिघे जण गेंड्यांच्या शिकारीसाठी तिथे आले असल्याचा त्यांना संशय होता. वनसंरक्षकांना पाहिल्यावर त्या तिघांनीही पळ काढला आणि ते हत्तींच्या एका कळपात शिरले. त्यात मोठे हत्ती आणि हत्तींची पिल्लंही होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

तिघांपैकी एका संशयिताला बऱ्याच प्रयत्नांनंतर अटक करण्यात आली. शोधकार्यात हेलिकॉप्टर आणि श्वानपथकाचाही समावेश होता. आपला एक साथीदार मरण पावला असल्याची शक्यता त्याने पोलिसांकडे वर्तवली होती. त्यानंतर वनसंरक्षकांनी त्याच्यासह ते तिघे ज्या मार्गावरून गेले होते, त्या मार्गावर पुन्हा फिरून शोध घेतला. त्या वेळी, हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह सापडला. दरम्यान, जखमी झालेल्या त्या तिघांपैकी एक जण या वेळी पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

(हे वाचा-आजारी मुलाला जपानमधून आणण्यासाठी हवेत सव्वा कोटी; वडिलांनी मोदींकडे मागितली मदत)

अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्याकडून एक रायफल, कुऱ्हाड असलेली एक बॅग आणि अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यावरून ते गेंड्यांची शिकार करण्यास आल्याचं स्पष्ट होतं, असं अधिकाऱ्यांनी एबीसी न्यूजला सांगितलं. क्रूगर नॅशनल पार्कचे व्यवस्थापकीय अधिकारी गॅरेथ कोलमन यांनी या संदर्भातलं एक निवेदन जाहीर करून या शिकाऱ्याला पकडणाऱ्या टीमचं कौतुक केलं आहे.

(हे वाचा-काय आहे सेक्स सरोगेट? इस्त्रायली जखमी जवानांना सरकारी खर्चातून दिली जाते थेरपी)

'पार्कमध्ये घडलेला प्रसंग आणि मृत्यू दुर्दैवी आहे; मात्र क्रूगर नॅशनल पार्कमधल्या गेंड्यांची शिकार केवळ टीमवर्क आणि शिस्तबद्धतेतूनच थांबवता येऊ शकते. शिकार थांबवणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. कारण शिकारीमुळे, तस्करीमुळे अनेकांची उपजीविका नष्ट होते, कुटुंबं उद्ध्वस्त होतात. तसंच ज्या साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकास होऊ शकतो, तेच दावणीला बांधले जातात,' असं कोलमन यांनी निवेदनात म्हटलं आहे.

पळून गेलेल्या तिसऱ्या शिकाऱ्याला ओळखण्यात आणि पकडून देण्यात स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

First published: April 21, 2021, 10:53 AM IST

ताज्या बातम्या