इस्लामाबाद, 4 मे : पाकिस्तानच्या (Pakistan) माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी दावा केला आहे की, माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना गेल्या महिन्यात अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवल्यानंतर 15 कोटी पाकिस्तानी रुपयांची आलिशान कार स्वतःकडेच ठेवली आहे. मरियम यांनी सांगितलं की, "इम्रान खान यांनी त्यांच्यासोबत बीएमडब्ल्यू (BMW bulletproof car) एक्स 5 कार घेतली, जी परदेशी शिष्टमंडळांसाठी आणि पंतप्रधान कार्यालयासाठी असलेल्या कारच्या ताफ्यांपैकी एक आहे." ती बुलेटप्रूफ आहे आणि सहा वर्षांपूर्वी सुमारे 3 कोटी पाकिस्तानी रुपयांना खरेदी केली गेली होती.
'इम्रान यांना कार स्वतःकडे हवी आहे'
डॉन वृत्तपत्राने मंत्री मरियमच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, खान यांनी ही कार आपल्याकडे ठेवण्याचा आग्रह धरला आहे. तर, यापूर्वी त्यांनी स्वतः पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील महागड्या गाड्या स्वतःकडे ठेवल्याबद्दल मागील सरकारांवर टीका केली होती. मरियम यांनी असा दावा केला की, खान यांनी दुसर्या देशाकडून भेट दिलेली एक हँडगन देखील स्वतःकडे ठेवली आहे. ती पाकिस्तानच्या तोशखान्यात जमा करायला हवी होती.
भेटवस्तूंबद्दल पाकिस्तानचा कायदा काय म्हणतो?
पाकिस्तानच्या कायद्यानुसार दुसऱ्या देशाच्या पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवल्या पाहिजेत. गेल्या महिन्यात इम्रान खान यांचा अविश्वास प्रस्तावात पराभव झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. तेव्हापासून, त्यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफला शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून परदेशी भेटवस्तूंवरून विरोध होत आहे.
पंधरवड्यापूर्वी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नवीन सरकारला खान यांना त्यांच्या अधिकृत भेटींमध्ये मिळालेल्या भेटवस्तूंचा तपशील सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आणि असं म्हटलं की, इतर देशांच्या सरकारांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तू पाकिस्तान सरकारच्या मालकीच्या आहेत. संबंधित व्यक्तीच्या किंवा विशिष्ट व्यक्तीच्या नाहीत. प्रत्युत्तरादाखल खान म्हणाले की, त्या भेटवस्तू त्यांच्याच आहेत आणि त्यांनी त्या आपल्याजवळ ठेवाव्यात की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. खान म्हणाले, "माझ्या भेटवस्तू, माझी इच्छा."
लाच घेतली, पीठ-साखर घोटाळा करून पैसे कमवले
इम्रानने केवळ सरकारी भेटवस्तूंमध्येच घोटाळा केला नाही, तर साखर आणि पीठ घोटाळा करून भरपूर पैसा कमावल्याचंही मरियम म्हणाल्या. त्यांनी पुढं सांगितलं की, पाकिस्तानात आल्यानंतर दुसऱ्या देशाच्या राजनैतिक व्यक्तीने इम्रान यांना हँड गन भेट दिली होती. मात्र ती देशाच्या डिपॉझिटरीमध्ये जमा करण्याऐवजी इम्रान यांनी ती महागड्या किमतीत विकली.
हे वाचा -
'जगातील सर्वात लांब काचेचा पूल'नागरिकांसाठी खुला! आकाशातून दिसेल जंगलाचं सौंदर्य
अटकेची टांगती तलवार
दरम्यान, इम्रान खान यांना कधीही अटक होऊ शकते, अशी बातमी आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांच्यावर ईशनिंदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. त्याचवेळी, इम्रान खान यांच्या पक्षाने माजी पंतप्रधानांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. परंतु, सध्याचं सरकार इम्रान खान यांच्यावर कठोर कारवाई करू शकतं, असं वृत्त आहे.
हे वाचा -
21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेश
पीटीआयच्या 150 जणांवर गुन्हा दाखल
शाहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यात मदिना मशिदीत 'चोर-चोर' आणि 'देशद्रोही-देशद्रोही'च्या घोषणा देण्यात आल्या, त्यावर सौदी अरेबियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून राजकारणासाठी मशिदीचा वापर केला जात आहे. असं केल्याच्या आरोपावरून अनेक पाकिस्तानींना सौदी अरेबियातून पाकिस्तानात परत पाठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर इस्लामिक गुरूंनीही मदिना मशिदीतील घोषणाबाजीला अपवित्र म्हटलं आहे. या प्रकरणी पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यासह 150 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.