लंडन, 30 एप्रिल : कोरोनाचं संकट अवघ्या जगावर ओढावलं आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. आतापर्यंत अशी अनेक उदाहरणं समोर आली आहेत की जिथं पती पत्नीला कोरोनामुळे मृत्यूने गाठलं. अखेरच्या क्षणापर्यंत साथ देणाऱ्या दाम्पत्यानं एकाच वेळी प्राण सोडल्याच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान आता अशीच एक पण धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीने स्वत:ला लावलेला ऑक्सिजन मास्कही काढला. त्यानंतर पुढच्या पाच तासात पतीचाही मृत्यू झाला.
इंग्लंडच्या साउथॅम्पटन इथल्या बिल डार्टनल यांनी पत्नीच्या निधनानंतर असा धक्कादायक निर्णय घेतला. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या 81 वर्षांच्या पत्नीला गेल्या आठवड्यात कोरोना झाल्याचं निदान झालं. त्यानंतर जनरल हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं.
बिल यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीच तासात बिलची तब्येत बिघडली. त्यानंतर बिल यांनाही त्याच रुग्णालयात दाखल केलं. मेरी आणि बिल यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मेरी यांचा मृत्यू झाला आणि याचा धक्का बिल यांना बसला.
हे वाचा : अमेरिकेनं कोरोनाला कधीच हरवलं असतं, 14 वर्षांपूर्वीचं 'शटअप' पडलं महागात
पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी ऑक्सिजन मास्क काढला. तेव्हा त्यांच्या मुलींनी मास्क लावण्याचा प्रयत्न केला पण बिल यांनी ऐकलं नाही. मुलींनी सांगितलं की, त्यांनी स्पष्टपणे ऑक्सिजन लावणार नाही असं म्हटलं. ते आईशिवाय राहू शकत नव्हते. शेवटी झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचा : भारतीय मुलीची चॉइस NASA ला आवडली, पहिल्या मार्स हेलिकॉप्टरला दिलं हे नाव