मुंबई, 03 फेब्रुवारी : भिंतीच्या आरपार बघण्याची शक्ती असलेले सुपरहिरो अनेक कार्टून किंवा टीव्ही मालिकांमध्ये दाखवले जातात. प्रत्यक्षात सामान्य माणसाला असं करणं शक्य नाही. कारण, यासाठी महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान केवळ सरकारी संस्थांकडेच उपलब्ध असतं किंवा उच्चस्तरीय सुरक्षा प्रदाते हे वापरू शकतात; मात्र, आता सामान्य व्यक्तींनाही भिंतीच्या आरपार बघणं शक्य होऊ शकेल. अमेरिकेतल्या पेनसिल्व्हानियामधील कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी भिंतीपलीकडे मानवी हालचालींचा माग काढण्याचा एक स्वस्त मार्ग शोधला आहे. शास्त्रज्ञांनी वाय-फाय राउटरच्या मदतीने भिंतीतून आरपार पाहण्याचं तंत्रज्ञान तयार केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे भिंतीच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीचा 3D आकार तर दिसतोच, शिवाय त्याच्या पोझबद्दलदेखील माहिती मिळते.
रिसर्चर्सनी एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी डीप न्यूरल नेटवर्कचा (डेन्स पोझ) कसा वापर केला आहे, हे स्पष्ट केलं आहे. डेन्स पोझ तंत्रज्ञान वाय-फाय सिग्नलच्या मदतीने यूव्ही कॉर्डिनेट मॅपिंग करतं. याचा वापर करून, 3D मॉडेल सर्फेस 2D फोटोमध्ये प्रक्षेपित केला जातो. इम्पीरियल कॉलेज लंडन, फेसबुक एआय आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधल्या संशोधकांनी हे डेन्स पोझ तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याचाच वापर कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी केला आहे. या प्रोजेक्टच्या मदतीने अनेक वस्तूंच्या पोझेस अचूकपणे मॅप करण्यात आल्या आहेत. महागडे आरजीबी कॅमेरे, LiDAR आणि याऐवजी हे नवीन तंत्रज्ञान अगदी स्वस्तात काम करू शकतं.
हेही वाचा : ChatGPT : चॅट-जीपीटीने वाढवली प्रोग्रामर्स अन् शिक्षकांची चिंता; काय आहे कारण?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिसर्चर्स वाय-फाय वापरून मानवी पोझेसदेखील समजू शकतात. याबाबत रिसर्चर्सनी सांगितलं की, 'या रिसर्चच्या निष्कर्षातून असं निदर्शनास आलं आहे, की आमचं मॉडेल वाय-फाय सिग्नलच्या मदतीने अनेक गोष्टींच्या डेन्स पोझचा अंदाज लावू शकतं. ही एक अतिशय स्वस्त आणि जास्त अॅक्सेसेबल पद्धत आहे.'
रिसर्चर्सच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाचा वापर होम हेल्थकेअरमध्ये केला जाऊ शकतो. ज्या रुग्णांना कॅमेऱ्यांद्वारे मॉनिटरिंग नको असते, अशा ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. विशेषतः बाथरूमसारख्या ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरता येईल. खराब प्रकाश किंवा भिंतीसारख्या अडथळ्यांचा या तंत्रज्ञानावर परिणाम होत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.