मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

एका विषाणूने सारं जग कसं थांबवलं? 2020 या वर्षाचा धावता आढावा..

एका विषाणूने सारं जग कसं थांबवलं? 2020 या वर्षाचा धावता आढावा..

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

7 जानेवारी 2020 रोजी चिनी अधिकाऱ्यांनी 2019-nCoV हा नवा विषाणू सापडल्याचं अधिकृतरीत्या जाहीर केलं.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : SARS-CoV2 या एका विषाणूने (Virus) एखाद्या भयानक वादळाप्रमाणे साऱ्या जगाला या वर्षी हलवून टाकलं. या विषाणूमुळे कोरोनाव्हायरस डिसीज (Coronavirus Disease) अर्थात कोविड-19 (COVID-19) या रोगाचा फैलाव झाला आणि गेल्या 12 महिन्यांत जगभरात 8 कोटींहून अधिक जणांना या रोगाचा संसर्ग (Infection) झाला आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे वीस लाख जणांचा मृत्यू (Deaths) या रोगामुळे झाला आहे. या रोगाच्या प्रसाराचा आणि साहजिकच 2020 या वर्षाचा प्रवास कसा होता, याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...

चीनच्या वुहान (Wuhan) शहरात मासळी आणि मांसाच्या बाजारपेठेत अज्ञात विषाणूमुळे न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं निरीक्षण नोव्हेंबर 2019मध्ये नोंदवलं गेलं. त्यानंतर तातडीने बाजारपेठा बंद करण्यात आल्या. 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) चीनमधल्या कार्यालयाला या रोगाबद्दलचा अधिकृत अहवाल मिळाला. 7 जानेवारी 2020 रोजी चिनी अधिकाऱ्यांनी 2019-nCoV हा नवा विषाणू सापडल्याचं अधिकृतरीत्या जाहीर केलं. त्या विषाणूला नंतर SARS-CoV2 असं नाव देण्यात आलं.

हा विषाणू पुढच्या वर्षभरात अख्ख्या जगभरातल्या मानवजातीला वेठीला धरेल, अर्ध्याहून अधिक जगाच्या लॉकडाऊनला (Lockdown) कारणीभूत होईल आणि त्यामुळे एवढा हाहाकार माजेल, याचा कोणताही संकेत प्राथमिक अहवालांमध्ये नव्हता. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली. वुहानमधला हा 67 वर्षांचा माणूस मासळी बाजारात गेला होता आणि तिथून त्याला लागण झाली असावी, असा अंदाज होता. 23 जानेवारीपर्यंत चीनने वुहान आणि आजूबाजूच्या शहरांचा जगाशी असलेला संपर्क तोडून टाकला आणि जवळपास पाच कोटी जणांना क्वारंटाइन केलं. शहरातल्या बसेस, सबवे, फेरी बंद करण्यात आल्या. तसंच, विमान आणि रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आल्या. वुहानच्या रस्त्यांवर भयाण शांतता पसरली. स्टीव्हन सोडेर्बर्गच्या काँटेजिऑन (Contegion) नावाच्या हॉलिवूड चित्रपटातल्या दृश्याशी साधर्म्य दर्शविणारे दृश्य खरेच दिसू लागले, हा योगायोगच.

भारताने वुहानमधल्या भारतीयांना आणण्याची मोहीम एक फेब्रुवारीपासून सुरू केली. तोपर्यंत चीनमध्ये या रोगाने 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच दोनच आठवड्यांत ली वेनलियांग या चिनी डॉक्टरचाही कोविड-19मुळे मृत्यू झाला. भविष्यात भयानक रूप धारण करू शकेल, अशा रोगाशी लढण्यात चीनला आलेल्या अपयशाबद्दल त्याने जगाला सांगितलं; मात्र त्याबद्दल त्याला व्हिलन ठरवण्यात आलं होतं.

या रोगाचा अमेरिकेला सर्वांत जास्त फटका बसला. तिथे कोविड-19ची लागण झालेल्यांची संख्या आतापर्यंत दोन कोटींपर्यंत पोहोचली असून, तीन लाखांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे प्राण या रोगाने घेतले आहेत. अमेरिकेनंतर या यादीत भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून, सुमारे दीड लाख भारतीय या रोगाला बळी पडले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या रोगाचा सर्वाधिक फटका बसला. मास्क्स, सॅनिटायझर्स (Masks, Sanitizers) या घरातल्या नेहमीच्या वस्तू बनल्या, तर 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) हे 'न्यू नॉर्मल' (New Normal) बनलं.

फेब्रुवारीत चीनच्या बाहेर कोविड-19चे जेवढे ज्ञात पेशंट होते, त्यापैकी निम्म्याहून अधिक पेशंट डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझ शिपवर होते. एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्यावर ही क्रूझ शिप योकोहामा बंदरात क्वारंटाइन (Quarantine) करून ठेवण्यात आली. त्यावरच्या 3600हून अधिक प्रवाशांपैकी 700 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 14 जणांना प्राण गमवावे लागले.

14 फेब्रुवारीला फ्रान्समध्ये कोविड-19चा पहिला बळी गेल्याची घोषणा करण्यात आली. या रोगाचा युरोपमधला (Europe) हा पहिलाच बळी होता. त्याचदरम्यान चीनमध्ये या रोगाच्या बळींची संख्या वेगाने वाढत होती. हुबेई प्रांतात बऱ्याच जणांचे बळी गेले. इटलीत तर हा विषाणू अवघ्या 10 दिवसांत एखाद्या वणव्यासारखा पसरला. आधी मिलान आणि नंतर लोंबार्डी प्रदेशात त्याचा मोठा प्रादुर्भाव झाला. हॉस्पिटल्स पेशंटनी अक्षरशः भरून वाहत होती. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्राणाला मुकावं लागलं.

इटली हा या रोगाचा युरोपातला हॉटस्पॉट बनलेला असतानाच फेब्रुवारीत इराण दुसऱ्या क्रमांकावर आला. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ब्राझीलमध्ये पहिला रुग्ण सापडल्याची नोंद झाली, तर अमेरिकेत पहिला रुग्ण मृत झाल्याची नोंद झाली.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही जागतिक महामारी असल्याचं फार उशिरा म्हणजे 11 मार्च रोजी जाहीर केलं. 13 मार्चला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. 50हून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आणि न्यूयॉर्कमधल्या सरकारी शाळा बंद करण्यात आल्या. टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकललं असल्याची घोषणा 24 मार्चला करण्यात आली. ऑलिम्पिक्सच्या इतिहासात ऑलिम्पिक स्पर्धा याआधी केवळ तीनदाच रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्याही पहिल्या दोन जागतिक महायुद्धांमुळे.

चीन आणि इटलीला (China & Italy) मागे टाकून अमेरिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक झाली आहे, असं 26 मार्चला अमेरिकेकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. मॉस्कोमध्येही (रशिया) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या एका आठवड्याच्या काळात दुप्पट झाली.

मे महिन्यात अमेरिकेतल्या अनक शहरांत उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी निदर्शनं केली. निर्बंध शिथिल करावेत, अशी त्यांची मागणी होती. जूनपर्यंत जगभरातल्या कोरोनाबाधितांची ज्ञात संख्या वेगाने वाढत गेली. जगभरात दिवसाला लाखभर नव्या रुग्णांची वाढ होऊ लागली. जूनच्या मध्यापर्यंत लॅटिन अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि अमेरिका या प्रदेशांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेल्याने जगभरातला आकडाही वाढत गेला.

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळला. तो वुहानमधून परतलेला एक तरुण होता. कोरोनामुळे भारतातला पहिला मृत्यू 12 मार्चला नोंदवला गेला. कर्नाटकातल्या कलबुर्गीमधला 76 वर्षांचा पुरुष सौदी अरेबियात जाऊन आला होता. त्याचा मृत्यू त्या दिवशी झाला.

देशात निर्बंध कशा प्रकारे लागू करता येऊ शकतात, याची चाचपणी करण्यासाठी पंतप्रधानांनी 22 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दोनच दिवसांत देशभरातली विमानसेवा बंद करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीसाठी पहिला लॉकडाउन जाहीर केला. कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने तो लॉकडाउन तीन मेपर्यंत वाढवण्यात आला. कडक लॉकडाउनमुळे व्यापार-व्यवसायांवर दुष्परिणाम झाला. तसंच गरीब आणि स्थलांतरित मजुरांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. रोजगार गेल्यामुळे त्यांनी आपापल्या घराची वाट धरली. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी हायवे-रेल्वेलाइनच्या बाजूने शेकडो किलोमीटर चालत चाललेल्या मजुरांचे जथ्थे हे दृश्य सर्वत्र दिसू लागलं. त्यामुळे सरकारला बस आणि रेल्वेगाड्यांची सोय करणं भाग पडलं.

गरिबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 1.7 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर आत्मनिर्भर (AtmaNirbhar) नावाने 20 लाख कोटी रुपयांचं स्टिम्युलस पॅकेजही जाहीर करण्यात आलं. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. जून महिन्यापासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, तोपर्यंत स्थलांतरित कामगार आपापल्या गावी पोहोचल्यामुळे ग्रामीण भागांतही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा-कॉलेजेस वगळता देशभरात सर्व काही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठा पुन्हा गजबजून गेल्या, लॉकडाउनपूर्वी होतं त्याप्रमाणे ट्रॅफिक जॅम नित्याची झाली. आपलं जगणं पूर्वपदावर आणण्यासाठी नागरिक जिवावर उदार होऊन धडपडू लागले. स्थलांतरित कामगार पुन्हा आपापल्या कामाच्या शहरात परतू लागले.

भारतात अजूनही सरकारी आणि खासगी कार्यालयं कमी मनुष्यबळात कामकाज सांभाळत आहेत, तरीही देशभरात सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीत एकही नवा कोरोनाबाधित आढळलेला नाही. तसंच, अनेक राज्यांत बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली असून, लोकांच्या मनातली भीती जवळपास गेली असल्याचं चित्र आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना कोरोना महामारीचा मोठा फटका बसला. कारण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) पर्याय अवलंबता आला; मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन्स या गोष्टी सहजी उपलब्ध नव्हत्या. त्या विद्यार्थ्यांपुढे दोनच पर्याय होते - एक तर घरीच बसून राहायचं किंवा स्थानिक खासगी क्लासेसवर अवलंबून राहायचं. अख्खं शैक्षणिक वर्ष घरीच बसून काढायची वेळ विद्यार्थ्यांवर यापूर्वी कधीच आली नव्हती. शाळा बंद असल्यामुळे जगभरात 1.5 अब्ज विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं (United Nations) म्हटलं आहे.

कोविडने गरीब-श्रीमंत किंवा प्रभावी असा कोणताही भेदभाव केला नाही. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई आणि अहमद पटेल, शेफ फ्लॉइड कार्डझो, नाटककार टेरेन्स मॅकनाली अशा अनेकांचे प्राण कोविड-19ने घेतले. अगोदर मास्क घालण्यास नकार देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम जुलैमध्ये मास्क घातला. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाने गाठलेच. त्यांच्यासह ब्राझीलचे नेते जैर बोल्सोनारो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, अभिनेता टॉम हँक्स, फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, गायिका मॅडोना, प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्स अल्बर्ट (द्वितीय) आदी दिग्गज कोरोनाशी यशस्वीपणे लढा देऊ शकले.

या विषाणूमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर (Global Economy) विपरीत परिणाम झाला. लॉकडाउनच्या ओझ्यामुळे जगभरातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचे कंबरडे मोडले. महामंदीनंतर जागतिक अर्थव्यवस्था प्रथमच मोठ्या मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिल महिन्यातच दिला होता. 2009च्या जागतिक मंदीपेक्षा यंदाच्या मंदीची तीव्रता चौपट अधिक होती. पहिल्या काही आठवड्यांतच अमेरिकेत सुमारे एक कोटी जणांचे रोजगार गेले. 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी आकुंचित झाली. जपान, जर्मनीसारखे विकसित देशही मंदीचा सामना करत आहेत. हवाई वाहतूक, बांधकाम, ऑटोमोबाइल, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांवर या सगळ्याचा विपरीत परिणाम झाला. असं असलं तरीही, या सगळ्यातून पहिल्यांदा बाहेर पडणारी अर्थववस्था ठरली चीनची. चीनची अर्थव्यवस्था ही 2020 या वर्षात वाढ नोंदवणारी एकमेव अर्थव्यवस्था ठरली आहे.

विकसित देशांतल्या नाजूक आरोग्य यंत्रणा अजूनही परिस्थितीशी लढा देत आहेत. रुग्ण दाखल करून घेण्यासाठी पुरेशा बेड्सचा अभाव, औषध व साहित्य पुरवठा, तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या अशा अनेक अडचणी भेडसावत आहेत. दक्षिण कोरिया, तैवान, थायलंड, व्हिएतनाम, न्यूझीलंड यांसारख्या काही देशांनी मात्र महामारीच्या काळात परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, भारतात कोविड-19मुळे 500हून अधिक डॉक्टर्सचे प्राण गेले आहेत.

जगभरातले संशोधक या समस्येवर उपाय शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करून झटत आहेत. त्यामुळे आशेचा किरण दिसू लागला आहे. 2020 हे वर्ष संपतासंपता म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्रिटनने (UK) फायझर-बायोएनटेकच्या कोरोनाप्रतिबंधक लसीला लसीकरणासाठी परवानगी दिली. अशी परवानगी देणारा तो पहिलाच देश ठरला; मात्र तेव्हाच भीती पसरली आहे ती ब्रिटनमधल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची (New Strain). हा विषाणू 56 टक्के अधिक संसर्गक्षम असलेला आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने जगभर असलेल्या आनंदाच्या वातावरणात ही भीतीची लहर आहे. त्यामुळे ब्रिटनमधून येणाऱ्या आणि तिथे जाणाऱ्या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच, युरोपमध्येही सीमांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

ब्रिटनपाठोपाठ अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, मेक्सिको यांसारख्या काही देशांमध्ये लसीकरण सुरू झालं आहे. भारतातही लसीकरण कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे. आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, World After Corona