Home /News /videsh /

तोंडात अक्षरशः आग लावणारं आइस्क्रीम, पूर्ण संपवणाऱ्याला मिळतं मोफत

तोंडात अक्षरशः आग लावणारं आइस्क्रीम, पूर्ण संपवणाऱ्याला मिळतं मोफत

पण अशा थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमने (Hot Ice Cream) तोंडात गेल्यावर आग लावली तर? अशी कल्पना करू शकता का? पण खरं वाटत नसलं, तरी अशा प्रकारचं एक आइस्क्रीम आहे.

    नवी दिल्ली, 20 जून : आपल्याकडे उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू होतोय; पण पावसाला अजून तितकासा जोर नाहीये. त्यामुळे पाऊस थांबला, की लगेच उकडायला सुरुवात होते. हवामानशास्त्रानुसार पाहायला गेलं, तर पावसाळा म्हणजे उन्हाळ्याचाच उपऋतू. उन्हाळ्यात बहुतांश जणांना सर्वांत आवडणारी गोष्ट म्हणजे आइस्क्रीम. शरीरापासून मनापर्यंत सगळीकडेच थंडावा देणारं आइस्क्रीम आवडत नाही, अशा व्यक्ती अगदीच दुर्मीळ असतील. प्रत्येकाला वेगवेगळ्या फ्लेव्हरचं आइस्क्रीम आवडतं. सॉफ्ट सर्व्ह आइस्क्रीम्सची (Soft Serve Ice Creams) तर गोष्टच वेगळी; पण अशा थंडावा देणाऱ्या आइस्क्रीमने (Hot Ice Cream) तोंडात गेल्यावर आग लावली तर? अशी कल्पना करू शकता का? पण खरं वाटत नसलं, तरी अशा प्रकारचं एक आइस्क्रीम आहे. जपानमधल्या (Japan) हिराता या एका छोट्या गावात अशा प्रकारचं आइस्क्रीम मिळतं. तसंच, त्या आइस्क्रीमसोबतच एक चॅलेंजही असतं. या आइस्क्रीमला तोंड लावल्यानंतर ते टाकून देणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी असते; मात्र ज्या व्यक्ती हे संपूर्ण आइस्क्रीम खातात, त्यांच्याकडून दुकानदार पैसे घेत नाही. फुकुशिमामधलं (Fukushima) हिराता (Hirata) नावाचं हे गाव अशा वैशिष्ट्यपूर्ण तिखट आइस्क्रीमसाठी प्रसिद्ध आहे. त्या आइस्क्रीममध्ये नेमकं काय असतं, ते जाणून घेऊ या. हे वैशिष्ट्यपूर्ण आइस्क्रीम तिखट असतं. कारण त्यावर हॅबानेरो (Habanero) प्रकारच्या मिरचीची पावडर (Chilli Powder) घातलेली असते. जगातल्या सर्वांत तिखट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या काही मिरच्या आहेत, त्यामध्ये हॅबानेरो मिरचीचा समावेश होतो. या मिरचीची पावडर हिराता गावातल्या कोन आइस्क्रीमवर घातली जाते. एखादी व्यक्ती किती तिखट सहन करू शकते, यावर ती व्यक्ती हे आइस्क्रीम खाऊ शकेल की नाही हे अवलंबून आहे. हे तिखट सामान्य नसतं. म्हणूनच हे आइस्क्रीम खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून दुकानदार आधीच एक स्पष्टीकरण लिहून घेतो, की तो ग्राहक स्वतःच्या जबाबदारीवरच हे आइस्क्रीम खात आहे. हे आइस्क्रीम तयार करणं तर कठीण आहेच आणि खाणंही तितकंच कठीण आहे. जपानमधल्या एका प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोमधल्या रिपोर्टरने हे आइस्क्रीम ट्राय केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. हे आइस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वाट लागते, ते हा व्हिडिओ पाहिल्यावर कळू शकतं. 2011 साली फुकुशिमामध्ये या आइस्क्रीमची सुरुवात झाली. त्सुनामी आणि रेडिएशनच्या धोक्यामुळे तिथल्या नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणं अवघड होऊन बसलं होतं. त्यातच तिथले शेतकरी छोट्या छोट्या आकाराच्या हॅबानेरो प्रकारच्या मिरच्यांची शेती करू लागले. 2015 साली या मिरच्यांची पावडर सॉफ्ट सर्व्ह आइस्क्रीमसोबत द्यायला सुरुवात झाली. ती कल्पना खूपच हिट झाली. एखादी व्यक्ती किती तिखट खाऊ शकते, त्यानुसार प्रत्येक जण त्या आइस्क्रीमवर मिरचीची पावडर घालून घेतो. जी व्यक्ती सर्वांत जास्त तिखट आइस्क्रीम खाते, त्या व्यक्तीकडून दुकानदार पैसे घेत नाही. अशी या आइस्क्रीमची गंमत आहे.

    First published:

    पुढील बातम्या