मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), 3 जून: महाराष्ट्रात कोकणात फिरलात तर तुम्हाला भुताखेतांच्या अनेक कथा ऐकायला मिळतील. भारतच काय अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही भुतांच्या अस्तित्वाबद्दल चर्चा झडतात. या सगळ्या गोष्टींमुळे इंग्रजी, हिंदी आणि मराठीतही भुतांशी संबंधित अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. तुम्ही जर असे हॉरर चित्रपट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
ऑस्ट्रेलियातल्या नॉर्थ क्विन्सलँड राज्यात असलेल्या ल्युसिंडा या खेड्यात एका बाहुलीच्या भुतानी दहशत निर्माण केली आहे. फक्त 406 लोकवस्तीच्या या गावातील प्रत्येकाला या बाहुलीबद्दल माहिती आहे पण अपशकुनाच्या भीतीने कुणीही त्याबद्दल बोलायला तयार नाही की पुढाकार घेऊन त्या बाहुलीपर्यंत जाऊन तपास करायला तयार नाही. गावातल्या एका झाडावर बांधलेल्या झोक्यावर ही बाहुली ठेवली आहे. याचा फोटोही सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे आणि Bad Omen म्हणून ही भीती आणखी पसरवली जाते आहे. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
गावकऱ्यांनी या बाहुलीचा संबंध भुताटकीशी लावला असून त्यामुळेच गावात भीतीचं सावट असल्याचं दबक्या आवाजात सांगितलंय. याहून महत्त्वाचं म्हणजे या भागातील खासदार निक डामॅटो यांनाही या बाहुली आणि त्यासंबंधीच्या सगळ्या कथाकहाण्यांबद्दल व्यवस्थित माहिती आहे पण त्यांनी याची शहानिशा करून भीती कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
जवळजवळ प्रत्येकाला या बाहुलीबद्दल माहिती आहे पण कुणीही बोलायला तयार नाही. खासदार निक डामॅटो एका वृत्तपत्राशी बोलले. ते म्हणाले, ‘प्रत्येकाला या बाहुलीबद्दल माहिती आहे पण कुणी काहीच बोलत नाही. कदाचित ही वायफळ भीती किंवा अफवाच असेल पण मला या सगळ्याशी स्वत: जोडून घेऊन लोकांच्या हातातलं बाहुलं व्हायचं नाही. या बाहुलीबद्दल प्रश्नच जास्त विचारले जात आहेत त्यामागचं गूढ शोधण्याचा प्रयत्न कमीच झाला आहे.’
हे वाचा: Shocking! अंतिम दर्शन सुरू असताना अचानक उठून बसला मृतदेह; VIDEO पाहून फुटेल घाम
एका उद्योजकानी स्थानिक वृत्तपत्राला सांगितलं की त्या झोक्यावर ती बाहुली एका जोडप्याने ठेवली आहे.
गेल्यावर्षी एक महिला या गावात रहायला आली आणि तिला तिच्या घरात एक गुप्त अशी खोली असल्याचं लक्षात आलं या खोलीमध्ये भयावह गोष्टी तिला सापडल्यामुळे ती भयभीत झाली. तिला या खोलीमध्ये अनेबेला चित्रपटातल्यासारखी एक बाहुली सापडली होती. साधारणपणे असं काही घडलं की लोक घाबरतात पण ती महिला घाबरली नाही. पण जेव्हा त्या महिलेला तिच्या घरातील नव्या बेसमेंटच्या भिंतीत सिमेंटने गाडलेलं एक बाहुलीचं भीतीदायक मुंडकं सापडलं तेव्हा मात्र ती प्रचंड घाबरली असं स्थानिक वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये छापून आलं होतं. अशा भयानक वस्तू सापडल्यावर त्या महिलेला तातडीने ते घर सोडण्याचा सल्ला स्थानिकांनी दिल्याचं ‘द सन’ च्या वृत्तात म्हटलं आहे.
हा भयावह अनुभव घेणाऱ्या महिलेच्या बहिणीने त्या बाहुलीच्या मुंडक्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत त्यानंतर नेटिझन्सने त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.