अथेन्स, 10 फेब्रुवारी : भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र जगभरात असेही काही देश आहेत, जिथे लोकसंख्येचा दर घटत आहे. ग्रीसची (Greece) गणना देखील अशाच देशांमध्ये होते. घटणारा जन्मदर ही ग्रीसमधील एक गंभीर समस्या आहे. ग्रीसमध्ये वेगाने कमी होणारी लोकसंख्या लक्षात घेता सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या समस्येला सामोरं जाण्यासाठी ग्रीस सरकारकडून ‘बेबी बोनस’ (Baby Bonus) योजनेची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच मुलांना जन्म दिल्यानंतर सरकारकडून बोनस स्वरुपात काही रक्कम मिळणार आहे. सध्या ग्रीसची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 4 लाख आहे.
किती मिळणार ‘बेबी बोनस’?
मुलांना जन्म देणाऱ्यांना ग्रीसमध्ये बेबी बोनस योजनेअंतर्गत 2 हजार युरो देण्यात येतील. भारतीय रुपयानुसार ही रक्कम दीड लाखाच्या घरात पोहोचते. एवढच नाही या योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
लोकसंख्येत वेगाने घट
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार ग्रीसमधील लोकसंख्या सुमारे 1 कोटींच्या आसपास आहे आणि यामध्ये वेगाने घट होत आहे. अहवालामध्ये नमूद केल्यानुसार जर ग्रीसमधील जन्मदर वाढला नाही तर येत्या काही वर्षात मोठ्या संख्येने लोकसंख्या कमी होईल. येत्या 30 वर्षात एकूण लोकसंख्येच्या 33 टक्के लोकसंख्या घटण्याची शक्यता आहे. जन्मदर वाढवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सरकारने ‘बेबी बोनस’ योजनेची घोषणा केली आहे.
ग्रीसव्यतिरिक्त हे देशही देतात बेबी बोनस
ग्रीसशिवाय अन्य देशांमध्ये देखील बेबी बोनसची योजना आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक रिपब्लिक, फ्रान्स, इटली, पोलंडसारख्या देशामध्ये देखील ही योजना राबवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बेबी बोनस म्हणून 5 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे 2 लाख 38 हजार रुपये देण्यात येतात. वेगवेगळ्या देशांमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.