बर्लिन, 2 डिसेंबर : जर्मनीने (Germany) ‘स्टर्मब्रिगेड 44’ (Sturmbrigrade 44) नावाच्या उजव्या विचारसरणीच्या गटावर (far-right extremist group) बंदी घातली आहे. जुन्या अतिरेकी विचारसरणीचा पुरस्कार करणारा हा समूह असून, सध्या हा गट जास्तच सक्रिय झाल्यानं त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय जर्मनीच्या आंतरिक मंत्रालयानं (Internal Ministry) घेतला.
छाप्यानंतर घेतला निर्णय -
जर्मनीतील तीन राज्यांमध्ये छापे टाकल्यानंतर या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. हा गट ‘वोल्फ्सब्रिगेड 44’ म्हणूनही ओळखला जातो. या गटाच्या सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्यावर आंतरिक खात्याचे मंत्री होर्स्ट सीहोफर यांनी या गटावर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आल्यानंतर अधिकारी या सदस्यांविरुद्ध पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने संबधित लोकांची संपत्ती, प्रचार साहित्य जप्त करू शकतील. ‘वोल्फ्सब्रिगेड 44’ गटाच्या १३ सदस्यांच्या घरांवर छापे घालण्यात आले.
अलीकडेच उदयाला आलेला गट -
‘स्टर्मब्रिगेड 44’ हा गट 2016 पासून अस्तित्त्वात आला असून, त्याच्या नावाचा अर्थ युद्धाशी संबधित आहे. तर 44 या अंकांचा संबंध नियो नाझीचा संकेत आहे. नियो नाझी समूहाचा भाग असणाऱ्या डर्लेवेंगर याचे लघुरूप ‘डीडी’चा हा संकेतांक आहे. सोहोफरचे प्रवक्ते स्टीव्ह एटलर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, जो कोणी आमच्या उदारमतवादी तत्वांच्या विरोधात काम करेल, त्याला आमच्या संविधानिक लोकशाहीतील निर्णायक प्रक्रियेचा सामना करावाच लागेल.
दुसऱ्या महायुद्धाशी संबंध - ‘स्टर्मब्रिगेड 44’ हे नाव दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध युद्ध कैदी ऑस्कर डर्लेवेंगर याच्याशी जोडलेले आहे. ऑस्कर डर्लेवेंगर आपल्या क्रूर अत्याचारांसाठी ओळखले जातात. यांच्या विचारधारेचे प्रतीक जुन्या जर्मन लिपीतील एक चिन्ह आहे. हे चिन्ह या गटातील लोकांच्या शर्ट आणि जॅकेटवर असते. बळाच्या जोरावर आपली स्वतंत्र पितृभूमी हस्तगत करणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे.
डर्लेवेंगर याचा अत्याचार -
‘स्टर्मब्रिगेड’ हे ऑस्कर डर्लेवेंगर याच्या नेतृत्वाखालील खास युनिट होते. ज्याने दुसऱ्या महायुद्धात अत्यंत क्रूर मानवी अत्याचार केले. महिला, मुलांसह त्यांनी हजारो निशस्त्र लोकांना ठार मारलं. त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक मजुराची त्यांनी हत्या केली. याच डर्लेवेंगर याच्यावर ‘स्टर्मब्रिगेड 44’ची श्रद्धा आहे.
‘स्टर्मब्रिगेड 44’च्या कारवाया –
हा समूह सध्याच्या उजव्या विचारसरणीच्या गटांशी निगडीत नाही, पण अन्य उजव्या विचारसरणीच्या गटांच्या संपर्कात आहे. 2018 मध्ये एका रेल्वेमध्ये हत्यारांचा साठा आणि या समूहाचे नाव असलेला टी शर्ट सापडला होता. त्या नंतर जुलैमध्ये हेसे, लोअर सॅक्सोनी आणि नॉर्थ ऱ्हाईन वेस्टफीला आणि सॅक्सोनी एनहाल्ट राज्यांमधील या गटाच्या सदस्यांच्या घरांवर छापे घालण्यात आले होते. 2019 मध्ये जर्मनीचे चीफ फेडरल प्रॉसिक्युटर यांनी या समूहाचे सदस्य घातक कारवाया करणाऱ्या गटाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून छापे घालण्याचे आदेश दिले होते. स्वस्तिक चिन्हाचा वापर करून काढण्यात आलेल्या एका मिरवणुकीत हे सदस्य सहभागी झाले होते.