पॅरिस, 12 सप्टेंबर : कमी कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे उत्तान कपडे परिधान केले या कारणावरून संग्रहालयात मज्जाव करण्याची घटना मोकळ्या विचारसणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये घडली आहे. यावरून फ्रान्समध्ये मोठा गदारोळ उठला आहे. मोठ्या गळ्याचा cleavage दिसेल असा ड्रेस घातला म्हणून फ्रान्सच्या एका म्युझियममध्ये महिलेला प्रवेश नाकारला. त्यानंतर तिने याबाबत Instagram पोस्ट केली. त्यावर सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे.
या महिलेने एक खुलं पत्र लिहून या प्रकाराबाबत म्युझियमला फटकारलं. तिने हे पत्र इंस्ट्राग्रामवरही टाकलं. त्यानंतर आता विविध स्तरातून यावर टीका होत आहे. जेनी ही एक फ्रेंच नागरिक आहे. या पत्रात तिने म्हटलं आहे की, 'म्युझी दी ओरसे' या म्युझियमच्या एका सदस्याने तिला हटकले आणि प्रवेश दिला नाही. कारण विचारल्यावर तिचा ड्रेस लो कट होता़, असं सांगण्यात आलं. यातून फ्रेंच संस्थेची दुतोंंडी भूमिका समोर येत असल्याचा आरोप तिने केला आहे़. जेनी ही फ्रेंच साहित्याची एक विद्यार्थिनी आहे. तिने Twitter वर या पत्राची एक कॉपी शेअर केली असून यासोबत तिने परिधान केलेल्या ड्रेसचा फोटोही टाकला आहे.
म्युझियमच्या प्रवेशद्वारात आल्यानंतर माझ्याकडे तिकिट काढण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता, 'आरक्षणाचा प्रभारी अधिकारी मला पाहून हादरला. मला कल्पनाही नव्हती माझं क्विव्हेज आणि स्तन या ठिकाणी वादाचा विषय ठरतील. मला फक्त स्तन नाही, मी म्हणजे केवळ एक शरीर नाही. तुमचं पाखंडी धोरण मला माझ्या संस्कारापासून आणि ज्ञानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही', असं तिने पत्रात म्हटलं आहे. ती मित्रांसोबत गेली असता जॅकेट घालण्याची तिला सक्ती करण्यात आल्याचे तिने म्हटलं. 'मी अंग झाकून घेतलं तेव्हाच आत प्रवेश दिला जाईल, असं मला सांगण्यात आलं. मला जॅकेट घालायचं नव्हतं. मला अपराध्यासारखं वाटतं, प्रत्येक जण माझ्या स्तनांकडे बघतोय,असं वाटलं', असं जेनीने पत्रात म्हटले आहे. लोकांचं लक्ष विचलित करणारी वस्त्र परिधान न करणे या सूचना संग्रहालयाच्या नियमात आहेत, असं म्युझियमतर्फे सांगण्यात आलं.
'माझा ड्रेस लोकांचं लक्ष विचलित करीत होता का?' असा प्रश्न तिने विचारला आहे. 'कपड्यांच्या मुद्यावरून प्रवेश नाकारणे कितपत योग्य आहे? एखाद्याच्या पेहरावावरून त्याला किंवा तिला संस्कृतीचे ज्ञान घेण्यास प्रवेश बंदी कशी काय घालू शकतात?' असे प्रश्न तिने यानिमित्ताने विचारले आहेत. सोशल मीडियावर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जेनीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अनेक स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत. सोशल मीडियावरून दबाव वाढल्यानंतर फ्रेंड म्युझियमने या प्रकाराबद्दल खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. ड्रेसमुळे प्रवेश नाकारणाऱ्या संबधित कर्मचाऱ्याचा शोध घेत असल्याचं आपल्या ट्विटर हॅन्डलवरून म्युझियमने जाहीर केलं आहे.