मुंबई, 12 मार्च : युक्रेनवर (Russia-Ukraine War) आक्रमण केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यावर जगभरातून टीका होतच आहे; पण रशियन जनताही त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. पुतीन यांचा निषेध करणाऱ्यामध्ये रशियातील गुप्तहेरांचाही समावेश आहे. पुतीन यांच्यावर माजी महिला रशियन गुप्तहेर (Woman Russian Spy) आलिया रोजा (Alia Roza) हिनेही जोरदार टीका केली आहे.
'
आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आलिया रोजा हिनं आपल्या देशाच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली असून, 'पुतीन आता माघार घेणार नाहीत, याचा शेवट करूनच थांबतील, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया तिनं व्यक्त केली आहे. 37 वर्षांची आलिया आता अमेरिकेत (USA) स्थायिक झाली असून, फॅशन पीआर (Fashion PR) म्हणून काम करते. लंडन, कॅलिफोर्निया आणि मिलानमध्ये तिचं काम चालतं. आलिया सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्यावरून ती वारंवार आपला विरोध व्यक्त करत असते. 'हे युद्ध पुतीन यांना हवं आहे, रशियाला नाही,' असं तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram) म्हटलं आहे.
'डेली स्टार'शी बोलताना आलिया म्हणाली, की पुतीन यांच्यासाठी हे युद्ध आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते काहीही करू शकतात. ते हे युद्ध हरू शकत नाहीत आणि माघारही घेऊ शकत नाहीत.
'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, सोव्हिएत रशियाच्या (USSR) सैन्यात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची मुलगी असलेली आलिया रोजा अगदी लहान वयात रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेत सहभागी झाली होती. वयाच्या 18व्या वर्षी तिनं चेचेन्या युद्धाची दहशत अनुभवली. रशियन गुप्तहेर म्हणून काम करताना घेतलेल्या अनुभवामुळे तिच्यावर मानसोपचार घेण्याची वेळ आली होती. त्यातून सावरल्यानंतर ती सातत्यानं शांततेचा पुरस्कार करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आलियानं या बाबी नोंदवल्या आहेत.
गुप्तहेर (SPY) म्हणून काम करत असताना आलियाला सांगितलेल्या व्यक्तीकडून माहिती काढून घेण्याचं काम देण्यात आलं होतं. अशा व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांना भुरळ घालून (Honey Trap) गोपनीय माहिती काढून घेण्याचं काम आलिया करत होती; मात्र हे काम करताना 2004 मध्ये ज्या व्यक्तीकडून माहिती काढून घेण्याचं काम तिच्यावर सोपवण्यात आलं होतं, त्याच्याच ती प्रेमात पडली. त्यामुळं तिचं रहस्य उघड झालं. त्या व्यक्तीचं नाव होतं व्लादिमीर. या व्यक्तीनेच नंतर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीपासून आलियाचा जीव वाचवला. आलिया हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून या टोळीनं तिचं अपहरण करून तिला जंगलात नेलं आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दहा जण तिला मारत होते. त्या वेळी व्लादिमीरने तिला वाचवलं; मात्र नंतर त्याची हत्या झाली. त्यानंतर 2006मध्ये आलियानं एका श्रीमंत रशियन व्यक्तीशी विवाह केला. काही कारणावरून तिच्या पतीला अटक झाली आणि नंतर तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आलियानं आपल्या एकुलत्या एका मुलाला घेऊन रशियातून अमेरिकेला प्रयाण केलं. आता ती तिथेच स्थायिक झाली आहे.
युक्रेनवरच्या युद्धामुळे रशियातल्या वेगवेगळ्या स्तरांतून टीका होत आहे. यात आता गुप्तहेरांचीही भर पडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.