अमेय चुंभळे, प्रतिनिधी
'अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या प्रस्तावांवर ट्रम्प यांनी सही करू नये म्हणून आम्ही प्रस्तावाची कागदपत्रं लवपून ठेवायचो', हे वाचल्यावर धक्का बसतो. जगातल्या सर्वात शक्तिशाली देशाच्या अधिकाऱ्यांवर ही वेळ आली आहे, हे वाचून वाईट वाटतं. पण हे खरं आहे. यावर विश्वास बसतो कारण 'फीअर - ट्रम्प इन द व्हाईट हाऊस' हे पुस्तक लिहिलंय जगप्रसिद्ध पत्रकार बॉब वूडवर्ड यांनी.
डोनाल्ड ट्रम्प विक्षिप्त, लहरी, तुसडे आहेत हे जगाला माहीत आहे. पण म्हणजे नक्की काय ? आणि त्यांच्या या अवगुणांचा अमरिकेच्या धोरणांवर नक्की कसा परिणाम होतो, प्रक्रियांवर नकारात्मक प्रभाव कसा पडतो, हे वूडवर्ड यांनी उलगडून दाखवलंय. अनेक प्रसंग ते अक्षरशः डोळ्यांसमोर उभे करतात, जीवंत करतात. आणि त्यांच्या लौकिकामुळे आपला विश्वासही बसतो.
हे पुस्तक ऐकीव माहितीवर लिहिलेलं नाही. वूडवर्ड यांनी शेकडो अधिकारी, मंत्री, कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, कागदपत्रं पाहिली, धोरणांचा अभ्यास केला. सर्वांची नावं त्यांनी छापलेली नाहीत, कारण अनेक उच्चपदस्थ अधिकारी गुपितं न सांगण्यास शपथेनं बांधिल आहेत. पण त्या अधिकाऱ्यांनाही सत्य बाहेर यायला हवंय, त्यांचा देश नक्की कसा धोक्यात आहे, हे जगाला कळायला हवं आहे.
पुस्तकात केवळ अमेरिकेची अंतर्गत धोरणंच उल्लेखलेली आहेत, असं नाही. अमेरिकेचा अध्यक्ष हा जगाचा नकाशा आणि अर्थव्यवस्था, दोन्ही बदलण्यास सक्षम असतो. इराण-अमेरिका अणुकराराला विरोध, क्युबा कराराला विरोध, पॅरिस हवामान करारामधून माघार घेणे, अमेरिकेचं अफगाणिस्तान-इराक धोरण या सगळ्यावर लेखकानं प्रकाश टाकला आहे. हे सगळं होत असताना ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातले मतभेद, हेवेदावे, षड्यंत्र...सर्व त्यांनी लिहिलंय.
नव्या प्रशासनात अनेक नवे लोक आले, त्यांच्याशी ट्रम्प यांचं वागणं, वादविवाद, काहींची गच्छंती हे सर्वही पुस्तकात जशास तसं सांगण्यात आलंय. अतिशयोक्ती नाही पण पुस्तकाची भाषा इतकी वाहती आणि जिवंत आहे, की वाचकाला व्हाईट हाऊसमध्ये असल्यासारखं आणि वरील घटना आपल्या डोळ्यासमोरच घडतायेत, असं वाटतं.
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या लेखात म्हटलंय ते खरं आहे - विद्यमान राज्यकर्त्यावर इतकं बोचरं आणि वास्तववादी पुस्तक अमेरिकेत लिहिलं जाऊ शकतं, हे तिथल्या लोकशाही, समाज आणि माध्यमांचं मोठं यश आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर वूडवर्ड यांच्यावर हल्ले झाले नाहीत आणि कुणी आंदोलनंही केली नाहीत.
वूडवर्ड यांचा लौकिक फार मोठा आणि जुना. 60च्या दशकात उघडकीस आलेलं वॉटरगेट स्कँडल ही वूडवर्ड यांचीच कामगिरी. त्यानंतर जवळपास सर्व अध्यक्षांच्या कारकीर्दावर त्यांनी पुस्तकं लिहिली. अशीच. खरी आणि निर्भीड. राजकारणाच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं फीअर आवर्जून वाचायलाय हवं.