विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार? आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये!

विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. निकाल प्रतिकूल आला तर मल्ल्याला ब्रिटनला भारताच्या स्वाधीन करावं लागेल.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 09:15 AM IST

विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार? आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये!

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगत असलेल्या मल्ल्यासाठी सोमवारचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. मल्ल्याला भारताला सोपवायचं की नाही याचा निर्णय लंडनचं न्यायालय देणार आहे. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालय निकाल देणार आहे.


न्यायालयाच्या या अपेक्षीत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये दाखल झालीय. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून असून. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.


या आधी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती. सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातल्या भांडणामुळे त्या दोघांनाही केंद्र सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Loading...


सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी'  हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.


काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.


देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती.


मध्यंतरी विजय मल्ल्याने लंडनमधील कोर्टाबाहेर धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो असा खळबळजनक खुलासा विजय मल्ल्याने केला होता. तसंच तडजोडीचा प्रस्ताव दिला होता पण त्यावर काही तोडगा निघाला नाही असा दावाही मल्ल्याने केला.


मात्र, अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याचा दावा खोडून काढला होता. विजय मल्ल्याचं वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे, माझी अशी कोणतीही भेट झाली नव्हती असा दावा जेटलींनी केला होता.


विजय मल्ल्यासाठी सज्ज आहे आर्थर रोड तुरूंग


विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती.


विजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती.


यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक 12 मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.

VIDEO : बडबड करतात म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थांच्या तोंडाला चिटकवला सेलोटेप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...