कोलंबस, 24 जानेवारी : कोविड-19 या साथीने (COVID19 Pandemic) जगभरात लाखो व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात अनेकांनी स्वतःच्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे; काही व्यक्तींचे नातेसंबंध, एकमेकांवरचं प्रेम इतकं अपार असतं, की मृत्यूही त्यांना वेगळं करू शकत नाही. या गोष्टीची प्रचीती येईल अशी घटना नुकतीच अमेरिकेत ओहियो राज्यात घडली. 90 वर्षांचे डिक मीक (Dick Meek) आणि 87 वर्षांच्या शिर्ले मीक (Shirley Meek) या आजी-आजोबांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता आणि त्यांनी दोघांनीही काही मिनिटांच्या अंतराने प्राण सोडले. नुकताच, 22 डिसेंबर रोजी त्यांनी लग्नाचा 70 वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. एकमेकांपासून दूर राहणं हा कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून केला जाणारा उपाय; मात्र जीवनाचा एवढा मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेल्या या दाम्पत्याच्या प्रेमात कोरोनाही अंतर निर्माण करू शकला नाही.
कोलंबसमधल्या (Columbus) रिव्हरसाइड हॉस्पिटलमध्ये या दाम्पत्याला दाखल करण्यात आलं होतं. WMCActionnews5 या पोर्टलवर त्याबद्दलचं सविस्तर वृत्त आलं आहे. सुरुवातीला कोरोनावरील उपचारांच्या नियमांनुसार या दोघांनाही हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दाखल करण्यात आलं होतं; मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष परवानगी घेऊन दोघांनाही एकाच खोलीत दाखल करण्याची विनंती केली, जेणेकरून त्या दोघांनाही शेवटचे क्षण एकमेकांसोबत व्यतीत करता यावेत. हॉस्पिटल प्रशासनाने ती विनंती मान्य केली.
'त्या दोघांनीही एकमेकांचे हात हातात धरलेले होते. नर्सने आईचं डोकं माझ्या वडिलांच्या खांद्यावर ठेवलं. नंतर आई वडिलांना म्हणाली, 'डिक, आता जायची वेळ झाली आहे. शिर्ले तुझी वाट पाहते आहे.' असं सांगून आईने प्राण सोडले. त्यानंतर काही मिनिटांतच वडिलांनीही प्राण सोडले,' अशा शब्दांत या दाम्पत्याच्या मुलीने या अत्यंत भावस्पर्शी प्रसंगाचं वर्णन केलं.
आई-वडिलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलींना मोठा धक्का बसला आहे. अशी उदाहरणं पाहून तरी लोकांनी कोविड-19ला गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
आणखी एक दुर्दैवाची गोष्ट अशी, की या दाम्पत्याची लसीकरणासाठीची (Vaccination) वेळ ठरली होती. त्याआधी तीन दिवस त्यांना मृत्यूने गाठलं.
अशाच प्रकारचा एक प्रसंग गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही घडला होता. त्या वेळी माइक ब्रूनो आणि कॅरल ब्रूनो या शिकागोमधल्या दाम्पत्याने कोविड-19मुळे आपले प्राण गमावले होते. त्यांनी कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती; मात्र त्यांची एकच चूक झाली, ती म्हणजे कॅरल केस कापून घेण्यासाठी घराबाहेर पडून त्यांच्या मुलाच्या घरी गेल्या होत्या. त्याचदरम्यान त्यांना संसर्ग झाला.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या दाम्पत्याचा मृत्यू 10 दिवसांच्या अंतराने झाला. त्या दोघांचं वैवाहिक जीवन 60 वर्षांचं होतं. त्यांचा मुलगा जोसेफ याने सांगितलं, की 'यावरून सर्वांनी लक्षात घ्यावं, की कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. केवळ एका चुकीमुळे माझ्या आई-वडिलांचे प्राण गेले.' त्यामुळे आवश्यक ती काळजी सदासर्वकाळ घेत राहणं हेच आपल्या हातात आहे.