मुंबई, 26 नोव्हेंबर : अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) ला पुढील दशकात दोन लोकांना मंगळ (Mars) ग्रहावर पाठवायचे आहे. हे अनेकांना विचित्र आणि अशक्य वाटत आहे, पण स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. त्यांनी यावर कोट्यावधी डॉलर्स खर्च केले जातील हे सुद्धा सांगितले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून एलन मस्क यांनी मंगळावर वसाहत बांधण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला मंगळावर लोक कसे जगतील, हे त्यांनी सांगितले. खरं तर एका ट्विटर वापरकर्त्याने विचारले की जोपर्यंत लोक मंगळावर पोहोचतील तोपर्यंत लाल ग्रह हा आधीच राहण्यायोग्य झाला असेल, की स्पेसएक्सने दुसऱ्या मार्गाचा विचार केला आहे?
ॲस्ट्रॉनॉमीयम नावाच्या ट्विटर वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मस्क यांनी सांगितले की मंगळावर ही पहिली मानवी वसाहत ग्लास डोम्सद्वारे बनवली जाईल. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मंगळावर असलेल्या मानवासाठी परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असणार आहे. अंतराळातून येणारे हानिकारक किरण, विपरित वातावरणात डीऑक्सिजेनेशन आणि अत्यंत कमी तापमानाचा सामना करावा लागतो. याशिवाय येथे अन्न आणि पिण्याचे पाणी तयार करणेदेखील खूप अवघड आहे.
एलन मस्क नुकतेच जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. याद्वारे त्यांनी आपल्या उपस्थितीत मंगळावर प्रवास करण्याचा आणि मानवांना एकापेक्षा जास्त ग्रहांवर राहणारी प्रजाती बनवण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगितले आहे. तसेच मंगळावर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे हेदेखील मस्क म्हणाले. त्याआधी लोकांना तेथे तात्पुरत्या निवासस्थानात राहावं लागेल, असेही त्यांनी आपल्या ट्विट मधून सांगितले.
टेराफॉर्मिंग प्रक्रियेचा वापर
मस्क म्हणाले की त्यांना आशा आहे की 2050 पर्यंत एकूण 10 लाख लोक मंगळावर राहू लागतील. लाल ग्रह मानवांसाठी अधिक राहण्यायोग्य बनवण्यासाठी त्यांनी टेरिफॉर्मिंग प्रक्रियेचा वापर करणार असल्याचे सांगितले आहे. त्या अंतर्गत मंगळाच्या ध्रुवांवर अणुबॉम्ब उडवले जातील. त्यामुळे मंगळाच्या ध्रुवांवर असलेले बर्फ वितळेल आणि संपूर्ण ग्रहात वेगाने उष्णता पसरण्यास मदत होईल, त्यामुळे लाल ग्रह मानवांसाठी राहण्यायोग्य बनेल.
टेराफॉर्मिंग आहे खूप महत्त्वाचे
2014 मध्ये मंगळाला राहण्या योग्य बनवण्यासाठी टेराफॉर्मिंग हा एक उपाय असल्याचे मस्क म्हणाले होते. एका मुलाखतीत सांगितले होते की टेराफॉर्मिंग ही खूपच हळू केली जाणारी प्रक्रिया आहे, पण त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ज्यामुळे ह्युमन बेस्ट नक्कीच तयार होऊ शकेल.
49 वर्षांच्या या अब्जाधीश व्यावसायिकाने सांगितले की, त्यांच्या आयुष्यात त्यांना अंतराळात प्रवास करण्याची इच्छा आहे. मस्क यांचे अंतिम लक्ष मंगळाला पृथ्वीसारख्या ग्रहात रूपांतर करणे हे आहे. ते म्हणतात की हे लक्ष्य वेगवान आणि हळू दोन्ही मार्गाने साध्य करता येणार आहे. जमिनीवर थर्मोन्यूक्लिअर शस्रे वापरणे हा सर्वांत वेगवान मार्ग यासाठी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली.