इंडोनेशिया 06 मार्च : इंडोनेशियामध्ये एका मगरीनं (Crocodile) 8 वर्षीय मुलाला गिळल्याची घटना घडली आहे. यानंतर 26 फुटाच्या मगरीला पकडण्यात आलं. या मगरीचं पोट फाडून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. द सननं दिलेल्या रिपोर्टनुसार, मृत मुलाचं नाव दिमस मुल्कान सपुत्रा असं आहे. दिमस आपल्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचवेळी घडलेल्या या घटनेत चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिमस मासे पकडण्यासाठी गेला असता अचानक मगर पाण्यातून बाहेर आली. यानंतर मगरीनं दिमसला ओढून पाण्यात नेलं. इंडोनेशियाच्या बेन्गेलॉन जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा दिमसचे वडील सुबलिआंस्याह हेदेखील त्याच्यासोबत होते. आपल्या मुलाला मगर पाण्यात खेचत असल्याचं पाहून त्यांनी मगरीचा पाठलाग केला. पोहोतच ते मगरीपर्यंत पोहोचले आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत आपल्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला.
दिमस याच्या वडिलांसाठी स्वतःच्या मुलाला मृत्यूच्या तोंडात जाताना पाहाणं अतिशय कठीण होतं. या घटननेंतर दुसऱ्या दिवशी मगरीला पकडण्यात आलं आहे. यानंतर तिचं पोट फाडून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मगरीनं एखाद्या लहान मुलावर हल्ला केल्याची ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियामध्ये अशीच आणखी एक घटना घडली होती. या घटनेत मगरीनं एका मुलाचा जीव घेतला होता. त्याचा मृतदेह आतापर्यंत हाती लागलेला नाही. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile