Home /News /videsh /

डॉ.जगन्नाथ वाणी यांचं कॅनडामध्ये वृद्धपकाळाने निधन

डॉ.जगन्नाथ वाणी यांचं कॅनडामध्ये वृद्धपकाळाने निधन

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ.जगन्नाथ वाणी यांचं कॅनडामध्ये वृद्धपकाळाने निधन झालं

06 मे : स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांचं  कॅनडामध्ये वृद्धपकाळाने निधन झालं. ते 83 वर्षांचं होते. स्किझोफ्रेनिया आजाराबदल आणि मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी राज्यात आणि विदेशात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. जगन्नाथ वाणी यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे इथं झाला होता. वाणी यांनी फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठातून बी.एस.सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे धुळे जिल्ह्यातील नामपूर गावचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी यांच्याशी ३१ मे १९५९ मध्ये विवाह झाला. जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या.  पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅक्गिल विद्यापीठात जगन्नाथ वाणी गणितीय संख्याशास्त्र (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स)मधे पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश आणि आर्थिक मदत मिळाली.१९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर जगन्नाथ वाणी पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या पत्नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन आणि अध्यासनाची निर्मिती आणि शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती आणि कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली. जगन्नाथ वाणी १९६५ सालापासून कॅनडाचे नागरिक होते. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार, प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमधे १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. जगन्नाथ वाणींचे कार्य - वेदान्त सोसायटी ऑफ कॅलगरी या संस्थेची १९७३ मध्ये स्थापना करून पौर्वात्य धर्माचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात शिष्यवृत्तीची तरतूद - भारतीय संगीत व नृत्याचा कॅलगरीतील रसिकांनी लाभ घ्यावा ह्यासाठी १९७५मधे ’म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगरी’ची स्थापना. - रागमाला परफॉर्मिंग आर्ट्‌स ऑफ कॅनडा’ची १९८२मधे स्थापना करून त्यातून उत्तर अमेरिकेत भारतीय संगीत व नृत्याचा प्रचार. - भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयांना वाहून घेतलेल्या उत्तर अमेरिकेतल्या ’बांसुरी’ ह्या इंग्रजी नियतकालिकाचे १९८४ मध्ये संस्थापक आणि १९९३ पर्यंत संपादक - साउंड्‌स ऑफ इंडिया ब्रॉडकास्टिंग असोशिएशन, अल्बर्टा कल्चरल हेरिटेज कौन्सिल, अल्लाउद्दीन स्कूल ऑफ म्युझिक, चेंबर म्युझिक सोसायटी ऑफ कॅलगरी, कॅमरोझ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट या संघटनांच्या कार्यकारी मंडळांचे सदस्य - धुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्राच्या समितीवर त्यांनी काम केले -१९८४ च्या ऑगस्टमधे कॅनडात महाराष्ट्र सेवा समिती ही धर्मादाय संस्था स्थापन या संस्थेद्वारे त्यांनी कॅनडातील विविध सरकारी योजनांमधून, भारतामधे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी, भारतातील निराधार, अपंग मतिमंद अनाथ, आदिवासी, कुष्ठरोगी, भटक्या जातीचे, गांजलेले शेतकरी भूकंपातील आपात्तग्रस्त आणि अनेक गरजूंच्या साहाय्यासाठी आणि पुनर्वसनासाठी आतापर्यंत कोट्यवधीची आर्थिक मदत पाठविली आहे. - १९९४सालापासून सुरू असलेल्या विज्ञान वाहिनी या फिरत्या प्रयोगशाळेच्या सुरुवातीच्या खर्चासाठी आर्थिक मदत. आज ही प्रयोगशाळा असलेली बस दरवर्षी १४० ग्रामीण शाळांना भेट देते.
First published:

पुढील बातम्या