News18 Lokmat

अमेरिकेचा सीरियाच्या हवाई तळावर मिसाईल हल्ला

अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन सीरियावर क्रूझ मिसाईल्सने मारा करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचा हा पहिलाच हल्ला आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2017 11:05 AM IST

अमेरिकेचा सीरियाच्या हवाई तळावर मिसाईल हल्ला

07  एप्रिल :  सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर आता अमेरिकेने सीरियाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन सीरियावर क्रूझ मिसाईल्सने मारा करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अमेरिकेचा हा पहिलाच हल्ला आहे. सीरियन हवाई दलाच्या शायरत हवाई तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. याच तळावरील विमानांनी सीरियात रासायनिक हल्ला केला होता.

शुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या जहाजांवरुन सीरियातील हवाई तळांवर मिसाईल्सने हल्ला केला. सीरियाने या हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सीरियात लढाऊ विमानांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. रासायनिक हल्ल्यानंतरचे भीषण चित्र समोर येताच जगभरात संतापाची लाट उसळली होती. संयुक्त राष्ट्रानेही या रासायनिक हल्ल्याचा निषेध केला होता.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असं ट्रम्प यांनी सांगितलं. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केलं. हा हल्ला करुन अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. सीरियाचे राष्ट्रध्यक्ष बाशर असाद या हल्ल्याला जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...