दुबई, 18 डिसेंबर: आईच्या मृत्यूनंतर (Mothers Death) अंत्यसंस्कारासाठी कंपनीनं भारतात (India) जाऊ दिलं नाही, म्हणून दुबईत (Dubai) राहणाऱ्या 38 वर्षीय एका भारतीय व्यक्तीनं (Indian Migrants) आपल्या सहकाऱ्यावर चाकूनं 11 वेळा वार (Stabbing) केले आहेत. गल्फ न्यूजच्या दिलेल्या बातमीनुसार, 22 वर्षीय पीडित व्यक्ती देखील अनिवासी भारतीय आहे. त्यानं सांगितलं की यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांची कंपनी 22 कर्मचार्यांना भारतात पाठवणार आहे. पण त्या 22 कर्मचाऱ्यांच्या यादीत आपलं नाव नाही म्हणून संबंधित भारतीय व्यक्तीनं आपल्या सहकाऱ्यावर चाकूनं हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीनं सांगितलं आहे की, "भारतात पाठवल्या जाणाऱ्या लोकांच्या यादीत त्याचं नाव का नाही? हे आरोपी व्यक्तीला जाणून घ्यायचं होतं" त्यानं मला सांगितलं होतं की माझी आई खूप आजारी आहे. त्यामुळं माझं घरी जाणं खूप गरजेचं आहे. मी त्याला सांगितलं की यावर मी निर्णय घेऊ शकत नाही. दुसर्याच दिवशी आरोपी व्यक्तीची आई मरण पावली. यानंतर आरोपी व्यक्ती चिडला आणि तावातावने आपल्या खोलीत गेला. काही मिनिटांनंतर तो चाकू घेऊन बाहेर आला आणि त्यानं त्याच्या सहकारी व्यक्तीच्या पोटात आणि छातीवर चाकूनं 11 वेळा वार केले. यावेळी आरोपी व्यक्ती दारूच्या नशेत होता, असंही पीडित व्यक्तीनं सांगितलं.
आरोपी व्यक्तीला आईच्या अंत्यसंस्काराला जायचं होतं
आरोपी व्यक्ती गेल्या एक वर्षापासून कंपनीकडे घरी जाण्यासाठी रजा मागत होता. पण त्याला सुट्टी मिळत नव्हती. त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मते, आईच्या आजारपणामुळं तो खूपच अस्वस्थ झाला होता. त्यातचं आईच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्याचं स्वतः वरचं नियंत्रण हरवलं. सर्वप्रथम तो त्याच्या खोलीत गेला आणि तोडफोड केली आणि त्यानंतर स्वयंपाकघरातून चाकू घेऊन पीडिते व्यक्तीकडे धावत गेला आणि न थांबता त्या व्यक्तीवर अनेक वार केले. आरोपीच्या मते, तो घरी न जाण्यास ही पीडित व्यक्ती जबाबदार होती.
दुबई पोलिसांनी सध्या पीडित आणि हल्लेखोर व्यक्तीच्या कंपनीचं नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे. सध्या आरोपी व्यक्ती दुबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा खटला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. पीडित व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तो धोक्याच्या बाहेर आहे.