अहमदाबाद, 05 जानेवारी: बड्या घरात जन्म घेतलेली लेकरं आपलं सारं आयुष्य आपल्या आजोबा-पणजोबांनी कमावलेला पैसा खर्च करण्यात घालवतात. त्यांची एक वेगळी जीवनशैली विकसित करतात. पण हॉंगकॉंगमधील एका बड्या डायमंड व्यापाऱ्याची मुलगी याला अपवाद ठरली आहे. कारण तिनं अवघ्या २३ व्या वर्षी साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे.
अगदी जन्मापासून बक्कळ पैसा असलेल्या कुटुंबात वाढलेल्या या मुलींनं असा आपल्या परिघा बाहेरचा विचार केला आहे. म्हणून सर्वांनाच धक्का बसला आहे. घरी एवढा अमाप पैसा असताना ही मुलगी तपस्येकडे आकर्षित झाली आहे. तिनं आता तिचं संपूर्ण आयुष्य जैन भिक्षू म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या घराण्यातील केवळ एकाच मुलीनं हा निर्णय घेतला आहे, असं बिलकुल नाही. एकाच कुंटुबातील आई, मुलगी आणि आजी अशा तीन पिढ्यांनी साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. हाँगकाँगची रहिवासी असलेली परिशी शहा (वय 23) आणि तिची आजी इंदुबेन शाह (वय 73) आणि आई हेतलबेन हे रामचंद्र समुदायाच्या साध्वी हितदर्शनीश्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेण्यास तयार आहेत. उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दीसा आणि धानेरा येथे राहणाऱ्या कुटुंबिंयांनी त्यांच्या दीक्षा सोहळ्याची तयारी सुरू केली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी परिशीनं सांगितलं की, 'मी भारतात आल्यानंतर आजीसोबत डेरासरला येथे गेले. तिथे मी प्रवचन ऐकलं. या प्रवचनानं मी इतकी प्रभावित झाले की रेस्टॉरंटमध्ये जाणं किंवा चित्रपट पाहायला जाणंही विसरून गेले. त्यानंतर आम्ही प्रवचन ऐकण्यासाठी सतत साध्वींकडे जाऊ लागलो. साध्वींसोबत वेळ घालवताना मला काहीतरी वेगळाच अनुभव यायचा. त्यानंतर मला कळालं की, कोणत्याही व्यक्तीला वास्तविक आनंद त्याचा अंतर्मनात होतं असतो. त्यामुळं मी साध्वी बनण्याचं ठरवलं.
परिशीनं मानसशास्त्रात शिक्षण पूर्ण केलं आहे
परिशीनं हाँगकाँगमधून मानसशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. तिनं आपलं शालेय शिक्षणही हाँगकाँगमध्येच पूर्ण केलं आहे. तिचे वडिल भरत मेहता हाँगकाँगमध्ये हिऱ्याचा व्यवसाय करतात. तर परिशीचा त्याचा भाऊ जयनाम अमेरिकेत डेटा सायन्सचं शिक्षण घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.