Corona ने गाठलं तरी सोडली नाही 50 वर्षांची साथ; हातात हात धरूनच दोघांनीही घेतला अखेरचा श्वास

Corona ने गाठलं तरी सोडली नाही 50 वर्षांची साथ; हातात हात धरूनच दोघांनीही घेतला अखेरचा श्वास

एकमेकांवर जीवापाड प्रेम असणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला Coronavirus ने घेरलं. पण त्यांनी अखेरचा श्वासही काही मिनिटांच्या अंतराने एकमेकांचा हात धरूनच घेतला.

  • Share this:

न्यूयॉर्क, 21 सप्टेंबर : Coronavirus ची भीषणता सगळ्या जगाने अनुभवली आहे. सोशल डिस्टन्सिंग, एकत्र जमण्यावर बंदी, सहकुटुंब कार्यक्रम करू नयेत अशा सूचना असल्याने माणसं दुरावणारा आजार म्हणून याकडे पाहिलं जातं. पण एका वयोवृद्ध जोडप्याने मात्र या भयंकर आजारातही एकमेकांची साथ सोडली नाही, अगदी शेवटपर्यंत.

प्रथम नवऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बायकोचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतरही त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं तरी उपचारांना प्रतिसाद देईनात. शेवटी दोघांना एकाच खोलीत हलवण्यात आलं. एकमेकांच्या शेजारीच त्यांना ठेवण्यात आलं. नवऱ्याने अखेरचा श्वास घेतला त्यानंतर अवघ्या काही मिनिटात बायकोचाही मृत्यू झाला.

अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिनाच्या सॅलिसबरी शहरातली ही हृदय हेलावणारी कोविड कहाणी CNN ने प्रसिद्ध केली आहे. या जोडप्याचं आडनाव - पीपल्स.

जॉनी ली पीपल्स आणि बायको कॅथी डार्लिन पीपल्स गेली अनेक वर्षं सॅलिसबरी इथे राहात होते. त्यांना तीन मुलं आणि 9 नातवंडं आहेत. जॉनी यांनी अमेरिकेन लष्करात 17 वर्षं नोकरी केल्यानंतर निवृत्ती घेतली होती. कॅथी डार्लिन या त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच निवृत्त व्हायच्या होत्या.

1 ऑगस्टला डार्लिन यांना ताप आला. पण त्यावेळी केलेली Covid-19 test नकारात्मक आली. 5 ऑगस्टला नवऱ्याला लक्षणं जाणवायला लागली. जॉनी यांची टेस्ट 7 ऑगस्टला पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 11 तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डार्लिन यांनाही श्वास घ्यायला त्रास जाणवायला लागल्याने रुग्णालयात दाखल केलं. तिथे केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आली.

दोघांवरही उपचार सुरू झाले. पण COVID-19 मधून ते बाहेर येऊ शकले नाहीत. कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर ठेवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी ते वाचू शकणार नाहीत, असं कुटुंबाला सांगितलं.

अखेर त्यांना एका खोलीत हलवलं आणि व्हेंटिलेटर दूर केला तेव्हा 67 वर्षीय जॉनी आणि 65 वर्षांच्या डार्लिन यांनी एकमेकांच्या साथीतच, अगदी हातात हात घेऊन प्राण सोडला.

"एक महिना आमचे आई-वडील कोरोनाशी लढा देत होते. पण 1 सप्टेंबरला डॉक्टरांनी सांगितलं की ते वाचू शकणार नाहीत. तेव्हा त्यांना एकत्रच एका खोलीत हलवण्याचा निर्णय घेतला", त्यांचा मुलगा शेन पीपल्स यांनी CNN ला सांगितलं.

"आई-वडिलांचा एकमेकांवर खूप जीव होता. गेली 50 वर्षं त्यांनी एकमेकांबरोबर काढली होती. अखेरच्या क्षणीसुद्धा एकमेकांचा हात हातात घेऊनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या स्मरणार्थ आम्ही एक निधी उभारत आहोत. डॉ. वंदना शशी यांच्या जनुकीय अभ्यास केंद्राला मदत म्हणून हा निधी दिला जाईल", असं शेन यांनी सांगितलं.

पीपल्स दांपत्याच्या दोन नातवंडांना दुर्मीळ जनुकीय आजार आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांनी आई-वडिलांच्या नावे उभा होणारा निधी या आजाराच्या संशोधनासाठी

ड्युक युनिव्हर्सिटी इथल्या Dr. Vandana Shashi's Genetic Sequencing Research in the Department of Pediatrics संस्थेला द्यायचं ठरवलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 21, 2020, 10:02 PM IST

ताज्या बातम्या