पॅरिस, 29 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर आता आणखीन एका देशात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढत असल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. या देशात कोरोनातून बरे होण्याचा म्हणजेच रिकव्हरी रेट अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्यानं प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कामाची कार्यालयं सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाइडलाइन जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे युरोपमधील रुग्णालयं आता अपुरी पडत आहेत.
हे वाचा-कोरोना मेंदूवर करतोय हल्ला; बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये असा दिसून आला दुष्परिणाम
कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी सध्या लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. शुक्रवारपासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. यावेळी फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कारखाने, शेती आणि बांधकाम यांचे काम चालू ठेवता येईल. याशिवाय नर्सिंग होमसुद्धा सुरू राहणार आहेत.
वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये 530 लोकांचा मृत्यू झाला. तर 33 हजार 417 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 लाखहून अधिक आहे. तर आतापर्यंत 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 13 हजार रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. 10 लाखहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा 5 वा क्रमांक आहे. अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक रुग्ण फ्रान्समध्ये सापडले असून रिकव्हरी रेट सर्वात कमी आहे.