GOOD NEWS : 96 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात, दिला हा सल्ला

GOOD NEWS : 96 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात, दिला हा सल्ला

'आत्मविश्वास आणि जगण्यावर प्रचंड प्रेम असलं की कुठल्याही आजारांवर मात करता येतं.'

  • Share this:

सोल 26 मार्च : जगभर कोरोना व्हायरसने घातलेला धुमाकूळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार जणांना त्याची लागण झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. असं गंभीर वातावरण असतानाच दक्षिण कोरियामधून एक चांगली बातमी समोर आली आहे. एका 96 वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली असून ती ठणठणीत बरी झाली आहे. डॉक्टरांचे उपचार आणि आत्मविशासाच्या बळावर मी मृत्यूवर मात केली असं या आजीने सांगितलंय.

दक्षिण कोरियातल्या चेओंगाडो प्रांतातल्या डेग्यू शहरात या आजी राहतात. हावांग असं त्या आजींचं नाव आहे. 14 मार्च रोजी त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. नंतर त्यांना डेग्यू मधल्या एक हॉस्पटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर सुरू झाला आजींचा कोरोनाविरुद्ध संघर्ष.

आजींचं वय पाहता त्या उपचारांना फारसा प्रतिसाद देतील असं डॉक्टरांना वाटलं नाही. त्यांनी आशा सोडली होती. मात्र आजींची जगण्याची जिद्द प्रचंड होती. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने उपचारांना साथ दिली. त्यानंतर जेव्हा काही दिवसांनी त्यांची टेस्ट केली गेली तेव्हा ती निगेटीव्ह आली. आता त्यांना त्यांच्याच घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आत्मविश्वास आणि जगण्यावर प्रचंड प्रेम असलं की कुठल्याही आजारांवर मात करता येतं. त्यामुळे विश्वास सोडू नका असा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला.

वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 21 हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाव्हायरस लवकरच मरेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

मायकल यांच्या मते, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा आधीच संपला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत 21 हजार लोकांचा मृत्यू झाला असला तरी 1 लाखांहून अधिक लोक निरोगीही झाले आहेत. त्यामुळं कोरोनावर मात करू शकतो, अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

वाचा-पिंपरीकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाचे 3 रुग्ण झाले ठणठणीत बरे तर....

लॉस एंजेलिस टाईम्सशी केलेल्या संभाषणात मायकल यांनी, "परिस्थिती जितकी भीतीदायक वाटत आहे तेवढी नाही आहे. चीनमध्ये 78 हजार लोक निरोगी झाले आहे. म्हणजे कोरोना विषाणू लवकरच मरू शकतो, यावर विश्वास आहे", असे सांगितले. अनेक आरोग्य तज्ञांचा असा दावा केला होता की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल, मात्र गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

First published: March 26, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading