Home /News /videsh /

Cororna Return! पुन्हा एकदा ओमिक्रॉनचं संकट, जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची शक्यता

Cororna Return! पुन्हा एकदा ओमिक्रॉनचं संकट, जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची शक्यता

कोरोनाचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये (China) सध्या ओमिक्रॉन (omicron) वेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. लवकरच तिथे रुग्णसंख्येची 'त्सुनामी' येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली, 12 मे : जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 'ओमिक्रॉन' (Omicron) या नवीन वेरिएंटची दहशत सर्वत्र पसरत होती. युरोपमध्ये तर ओमिक्रॉनने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला ओमिक्रॉनचा प्रसार भारतातदेखील झाला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या आणि सर्वांत घातक लाटेचा सामना करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या भारताने ओमिक्रॉन संकटातून व्यवस्थित मार्ग काढला. एप्रिल महिन्यापासून तर महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वच्यासर्व नियम शिथिल करण्यात आले. मात्र, जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोनाचं उगमस्थान असलेल्या चीनमध्ये (China) सध्या ओमिक्रॉन वेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. लवकरच तिथे रुग्णसंख्येची 'त्सुनामी' येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमधील फुदान युनिव्हर्सिटीतील (Fudan University) रिसर्चर्सनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर चीननं आपली झिरो-कोविड पॉलिसी (Zero-covid Policy) शिथिल केली तर तिथे जुलैपर्यंत (2022) 1.6 दशलक्षांहून अधिक नागरिकांचे मृत्यू होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) संसर्ग रोखण्यासाठी झिरो-कोविड पॉलिसीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबण्यास सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुदान युनिव्हर्सिटीतील रिसर्च समोर आला आहे. परिणामी, पुन्हा एकदा संपूर्ण जगानं चीनचा धसका घेतल्याचं चित्र आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फुदान युनिव्हर्सिटीने कम्प्युटर मॉडेल्सवरून अंदाज वर्तवला आहे की, कोविडचे निर्बंध शिथिल केल्यास चीनमध्ये कोरोनाची 'त्सुनामी' म्हणजेच मोठी महाकाय लाट येऊ शकते. कोविड निर्बंध शिथिल झाल्यावर मे ते जुलैदरम्यान ओमिक्रॉन लाट तीव्र होईल. असं झाल्यास, या काळात 11.22 कोटींहून अधिक रुग्णसंख्या नोंदवली जाईल आणि 51 लाखांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागेल. फुदान युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनमुळे चीनच्या आरोग्य यंत्रणेवरील भार 16 पटीने वाढेल. चीनमधील सध्याची परिस्थिती विचारात घेता फुदान युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या स्टडीमुळे चिंतेत भर पडली आहे. रिसर्चर्सच्या म्हणण्यानुसार, जर चीननं आपली झिरो कोविड पॉलिसी शिथिल केली तर जुलैपर्यंत मृतांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होईल. अंदाजे 16 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात. इतके मृत्यू जर झाले तर अंत्यविधीसाठीही जागा मिळणार नाही. या स्टडीमध्ये असं म्हटलं आहे की, मार्चमध्ये सुरू केलेली लसीकरण मोहीम ओमिक्रॉनची लाट रोखण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी पुरेशी सक्षम ठरलेली नाही. मात्र, जर लसीकरणाचा वेग वाढवला तर मृत्यूचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. रिसर्चर्सचं म्हणणं आहे की, ओमिक्रॉनमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये एक तृतीयांश संख्या ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि लसीकरण न झालेल्या लोकांची असू शकते. चीनमध्ये अजूनही 60 वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या 50 दशलक्ष वृद्धांनी लस घेतलेली नाही.

हे वाचा - Coronavirus in North Korea: दोन वर्षांत पहिल्यांदाच आढळला कोरोना बाधित, किम जोंग उन ने संपूर्ण देशात लावला Lockdown

WHO ने केली होती कानउघडणी - जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी चीनच्या झिरो कोविड पॉलिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जीनिव्हा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत टेड्रोस म्हणाले होते की, 'कोरोना व्हायरस सातत्यानं आपलं स्वरूप बदलत आहे आणि अधिक संसर्गजन्य होत आहे. त्यामुळे आता त्याला प्रतिबंध करण्याच्या पद्धतीदेखील बदलाव्या लागतील. सारासार विचार केला तर चीनची झिरो कोविड पॉलिसी फार काळ तग धरणार नाही. व्हायरसच्या बदलत्या स्वरूपापुढे ही पॉलिसी टिकणार नाही.' टेड्रोसच्या यांच्या या वक्तव्यावर चीनने आपली प्रतिक्रिया दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान (Zhao Lijian) यांनी प्रतिक्रिया दिली होती की, 'टेड्रोस यांनी अशी बेजबाबदार टीका करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. परिस्थिती कठीण असली तरी चीनची जनता आणि सरकार या विषाणूवर नियंत्रण मिळवेलच. ' चीनमधील सध्याची परिस्थिती पाहता जगातील इतर देशांची चिंता वाढली आहे. कारण, डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. 2020 मध्ये जेव्हा जगभरात कोरोना पसरू लागला तेव्हा चीनने त्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. 2021 मध्येही, जेव्हा डेल्टा वेरिएंट पसरत होता तेव्हा चीननं 14 दिवसांत त्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. पण, आता ओमिक्रॉन वेरिएंटमध्ये चीनची अवस्था बिकट झाली आहे. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त संसर्गजन्य आहे. म्हणूनच चीनमधील आरोग्य यंत्रणा आणि अधिकारी दहशतीमध्ये आहे. चीनमध्ये सर्वांत वाईट परिस्थिती शांघायची आहे. तिथे गेल्या सहा आठवड्यांपासून कडक लॉकडाउन आहे. 25 कोटींहून अधिक लोक लॉकडाउनमध्ये राहत आहेत. तर, संपूर्ण चीनमधील 40 कोटींहून अधिक लोक निर्बंधाखाली आहेत. फुदान युनिव्हर्सिटीच्या स्टडीनुसार जर परिस्थिती प्रत्यक्षात उद्भवली तर चीनमध्ये हाहाकार उडेलच शिवाय इतर ठिकाणीदेखील रुग्णसंख्या पुन्हा वाढेल.
First published:

Tags: Corona spread, Corona updates, Coronavirus, Omicron

पुढील बातम्या