मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोलंबियामध्ये पावसाचा हाहाकार, भूस्खलनात बस ढिगाराखाली अडकली, 33 जणांचा मृत्यू

कोलंबियामध्ये पावसाचा हाहाकार, भूस्खलनात बस ढिगाराखाली अडकली, 33 जणांचा मृत्यू

घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह शहरातील स्टेडियममध्ये ठेवले गेले आहेत.

घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह शहरातील स्टेडियममध्ये ठेवले गेले आहेत.

घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह शहरातील स्टेडियममध्ये ठेवले गेले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    कोलंबिया, 06 डिसेंबर : दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्येस असलेल्या कोलंबियामध्ये पावसानं सध्या धुमाकूळ घातला आहे. कोलंबिया गेल्या 40 वर्षांतील सर्वांत वाईट हवामानाचा सामना करत आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. रविवारी (4 डिसेंबर) कोलंबियातील रिसारल्डा प्रांतात पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एक बस आणि इतर वाहनं गाडली गेली आहेत. ज्यात किमान 33 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोलंबियाची राजधानी बोगोटापासून सुमारे 230 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुएब्लो रिको आणि सांता सेसिलिया या शहरांदरम्यान ही घटना घडली. कोलंबियातील हा डोंगराळ प्रदेश कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

    गाडली गेलेली बस कोलंबियातील तिसरं सर्वात मोठं शहर कॅली आणि कोंडाटो नगरपालिकेच्या हद्दीतील मार्गावर धावत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यात जवळपास 25 प्रवासी होते. अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीनं रेडिओ स्टेशनशी बोलताना सांगितले की, डोंगरावरून दरड कोसळत असल्याचं बघून चालकानं बस वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अगदी अपघात झाला तेव्हाही चालक बस मागे घेण्याचा प्रयत्न करत होता. पण, त्याला यश आलं नाही. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    (बाप रे!10,000 हून अधिक खोल्या व 70 रेस्टॉरंट; या ठिकाणी आहे हे आलिशान हॉटेल)

    कोलंबियाचे गृहमंत्री अल्फोन्सो प्राडा (Alfonso Prada) यांनी सांगितलं की, या घटनेमुळे सर्वजण दु:खी आहेत. आत्तापर्यंत आम्हाला 33 मृतदेह सापडले आहेत. ज्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या शिवाय नऊ जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुएब्लो रिकोचे महापौर लिओनार्डो पेबियो सिग्मा यांनी माध्यमांना सांगितलं की, घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृतदेह शहरातील स्टेडियममध्ये ठेवले गेले आहेत.

    सोमवारी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. सरकार या कठीण काळात पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं आहे, असं ते म्हणाले.

    (इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; नदीप्रमाणे वाहतोय तप्त लाव्हा, पुलही वितळले, भीषणता दाखवणारा VIDEO)

    कोलंबियातील नॅशनल युनिट फॉर डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटने (UNGRD) केलेल्या नोंदीनुसार, ऑगस्ट 2021 पासून ते या वर्षी (2022) नोव्हेंबर महिन्यादरम्यान, ला निनाच्या प्रभावाखालील प्रदेशातील आपत्कालीन घटनांमुळे अंदाजे सात लाख 43 हजार 337 प्रभावित लोकसंख्येपैकी 271 लोक मरण पावले आहेत आणि इतर 348 जखमी झाले आहेत.

    First published: