चायनीज गांधी लिऊ शाबो यांचं निधन

लिऊ शाबो यांचा तुरूंगातच मृत्यू झालाय. ते 61 वर्षांचे होते. 2010 साली शाबोंना शांततेचं नोबेल जाहीर झालं पण ते स्वीकारायलासुद्धा चीन सरकारनं त्यांना तुरूंगात सोडलं नाही.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2017 02:24 PM IST

चायनीज गांधी लिऊ शाबो यांचं निधन

16 जुलै : भारत आणि चीनमधले संबंध ताणलेले असतानाच चायनीज गांधी म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली त्या लिऊ शाबो यांचा तुरूंगातच मृत्यू झालाय. ते 61 वर्षांचे होते. 2010 साली शाबोंना शांततेचं नोबेल जाहीर झालं पण ते स्वीकारायलासुद्धा चीन सरकारनं त्यांना तुरूंगात सोडलं नाही.

ज्या तिआनमेन चौकातल्या एका फोटोनं चीनच्या अजस्र भिंतींच्या पाठीमागे दडपलेली घुसमट जगाच्या समोर आणली, त्याच प्रसंगानं लिओ शाबोंना लोकशाहीसाठी लढा चालवण्याची प्रेरणा मिळाली. लोकशाहीवादी आंदोलकांवर चायनीज सरकार रनगाडे चालवायला निघालं त्यावेळेस शाबो न्यूयॉर्कला लेक्चर देत होते. तिआनमेनचा विद्यार्थ्यांचा लढा पाहूनच शाबो चीनला परतले आणि एक पार्टी सरकारच्याविरोधात दंड थोपटायला सुरुवात केली. चीनमध्ये एक पक्षीय कम्युनिस्ट राजवट जाणं कसं गरजेचं आहे यावर त्यांनी छोटी छोटी भाषणं, लेख लिहायला सुरुवात केली. त्याच दरम्यान शाबोंना अटक झाली आणि जेलही.

चीनचा इतिहास रक्तरंजित आहे आणि मानसिकता अतिक्रमणवादी. पण शाबोंची लढाई मात्र पूर्णपणे गांधीवादी. अहिंसात्मक मार्गानेच लोकशाही मूल्यांसाठी त्यांनी लढा सुरूच ठेवला. समता, स्वातंत्र्य चायनीज माणसांचा अधिकार आहे, आणि त्याच्याशिवाय चायनीज माणसांची कशी घुसमट होतेय हे शाबोंनी पुन्हा पुन्हा सांगायला सुरुवात केली. चीन सरकारनं मग त्यांना जेरबंद केलं आणि 11 वर्षांची सजा सुनावली. गेल्या 25 वर्षांपासून शाबोंचा बहुतांश काळ जेलमध्येच गेलाय.

2010 साली शाबोंना शांततेचं नोबेल जाहीर झालं. पण ते स्वीकारायलाही चायनीज सरकारनं त्यांना सोडलं नाही. त्यावर जगभरातून चीनवर टीका झाली. उलट शाबोंची जेलबंदी आणखी कडक झाली.

काही वर्षांपूर्वी शाबोंना लिव्हरचा कॅन्सर असल्याचं उघड झालं. त्यांच्या ट्रिटमेंटसाठी त्यांना परदेशी जाऊ देण्याची मागणी केली पण तीही चीन सरकारनं फेटाळली. त्यातच गेल्या आठवड्यात शेवटी 61 व्या वर्षी शाबोंचं तुरूंगातच निधन झालंय. शाबोंचं निधन जरी झालं असलं तरीही चीनच्या अज्रस्त्र भिंतीला तडा देण्याचं काम शाबोंनी केलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...