बिजींग, 03 डिसेंबर : चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध चायना ब्लूम (China Bloom) कंपनीने ऑस्ट्रेलियातील (Australia) एक बेट 99 वर्षांच्या करारावर भाड्याने घेतले असून, तिथल्याच रहिवाशांनाच तिथं येण्यास मनाई केली आहे. त्यामुळं कंपनी आणि ऑस्ट्रेलियन नागरिक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला असून, वादाला तोंड फुटले आहे.
चीनी कंपन्या परदेशातील आक्रमक व्यवसाय विस्तारासाठी ओळखल्या जातात आणि यात त्यांनी चांगला जम बसवला आहे. सध्या चायना ब्लूम ही रिअल इस्टेट क्षेत्रातील चीनी कंपनी ऑस्ट्रेलियातील त्यांच्या एका प्रकल्पामुळे चर्चेत आली आहे. कंपनीने ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्याच बेटावर येण्यास मनाई केली आहे.
2019 मध्ये या कंपनीने केसविक (Keswick Island)या बेटाचा ताबा घेतला. तेव्हापासून या बेटांवर घरे असणाऱ्या नागरिकांना तिथं जाताच आलेले नाही. ऑस्ट्रेलियन नागरिकांनी इथं राहावं अशी कंपनीची इच्छा दिसत नसल्याचं, इथल्या माजी रहिवाशी ज्युली विलिस यांनी सांगितलं. चीनी पर्यटकांसाठीच हे बेट खुलं ठेवण्याचा कंपनीचा उद्देश दिसत आहे, असंही विलिस यांनी नमूद केलं.
इथं घरं असणारे रहिवासी सुट्टीच्या काळात आपली घरे एअरबीएनबी (AIRBNB) सारख्या ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटकांना भाडेतत्वावर देतात. मात्र या कंपनीने यावर बंदी घातली असून, कोणत्याही मार्गे पर्यटकांना इथं येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या बेटावरील पर्यटन उद्योग ठप्प झाला आहे.
हे वाचा-अखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात
इथल्या आणखी एक माजी रहिवासी रायना अस्बरी म्हणतात, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून इथं एकही पर्यटक आलेला नाही. हे बेट क्वीन्सलँड सरकारच्या (Queensland Government) मालकीचे असून त्यांनी ते राष्ट्रीय उद्यान (National Park ) घोषित केलं आहे. चीनी कंपनी आणि नागरिक यांच्यातील वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा क्वीन्सलँड डिपार्टमेंट ऑफ रिसोर्सेसने व्यक्त केली आहे. चायना ब्लूम आणि नागरिक यांच्याशी बोलून हा प्रकल्प पुढे नेणे ही या विभागाची जबाबदारी आहे. कंपनी या बेटावर रस्ते, बोट रॅम्प्स, जेट्टी आणि सागरी वाहतुकीसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारणार आहे. लीजच्या करारातील अटीनुसार काम होतेय की नाही, हे पाहणे ही देखील या विभागाची जबाबदारी आहे, असे या विभागाने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तणाव वाढत आहे. अलीकडेच एका चीनी अधिकाऱ्याने एक ऑस्ट्रेलियन सैनिक एका अफगाणी मुलाला ठार मारत असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे या दोन्ही देशांमधील वादाला तोंड फुटले आहे. चीनने आपण काही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी चीनला असे खोटे फोटो शेअर केल्याबद्दल फटकारले आहे.