दमास्कस,ता.09 एप्रिल : सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यात 80 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यात मुलांची संख्या मोठी आहे. तर जगभरातून टीका होत असल्यानं हा हल्ला इस्त्राईलनं केल्याचा आरोप रशियानं केलाय. सिरियातल्या यादवी युद्धाचा भीषण चेहेरा पुन्हा एकदा समोर आलाय. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या हल्ल्यात 80 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनांनी दिलीय. बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या डोमा शहरात रासायनिक शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप जगभरातून होतोय. या हल्ल्यात सगळ्यात जास्त जीव गेला तो लहान मुलं आणि महिलांचा.
हल्ल्यानंतर नागरिकांचा श्वास गुदमरला. हॉस्पिटलमधल्या लहान मुलांची ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. हॉस्पिटलच्या जीर्ण झालेल्या इमारती. औषधांचा तुटवडा. डॉक्टरांचा अभाव आणि रूग्णांची असलेली मोठी संख्या यामुळं हल्ल्यातल्या पीडितांवर फक्त नावापुरतेच उपचार होताहेत. उपचाराअभावी जीव गमावलेल्या लहान मुलांची संख्या तब्बल 40 असल्याची माहिती आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला सिरियन सरकार आणि अध्यक्ष बशर अल असाद यांना जबाबदार धरलंय. अध्यक्ष बशर अल असाद हे माणूस नाही तर 'जनावर' असल्याची कठोर टीका ट्रम्प त्यांनी ट्विटरवरून केलीय. या हल्ल्याची किंमत असाद सरकारला चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
जगभरातून टीका झाल्यानं सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या मदतीला रशीया धावून आलाय. सिरियावरचे हल्ले हे इस्त्राईलनं केल्याचा उलटा आरोप रशियानं केलाय. अमेरिका असाद विरोधी बंडखोरांचं समर्थन करतेय...तर रशिया आणि इराण अध्यक्ष असाद यांना पाठीशी घालतेय. महासत्तांच्या या संघर्षात बळी जातोय तो माणसांचा आणि माणुसकीचा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा