बिर्ला कुटुंबीयांचा अमेरिकेत अपमान; हॉटेलमधून हाकलल्यानंतर मुलीने वर्णद्वेषाविषयी व्यक्त केला संताप
उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबाला अमेरिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या मुलीने ट्वीट करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टन, 26 ऑक्टोबर: आदित्य बिर्ला समुहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्येला अमेरिकेत वर्णद्वेषचा सामना करावा लागला. अनन्या बिर्ला (Ananya Birla) यांनी याबाबत एक ट्वीट करत माहिती दिली आहे. अनन्या बिर्ला यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की “रेस्तराँ इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. हा वर्णद्वेष अत्यंत वेदनादायी आहे. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.”
अनन्या बिर्ला यांनी सांगितलं की त्या आपली आई नीरजा बिर्ला आणि भाऊ आर्यमनसोबत Scopa रेस्तराँमध्ये गेल्या होत्या त्यावेळी तिथल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बिर्ला कुटुंबासोबत वर्णद्वेष केला. त्यांना लॉस एंजेलिसमधील त्या रेस्तराँमध्ये जवळजवळ 3 तास त्यांना जेवणासाठी वाट बघावी लागली. असा अनुभव त्यांनी सांगितला.
We waited for 3 hours to eat at your restaurant. @chefantonia Your waiter Joshua Silverman was extremely rude to my mother, bordering racist. This isn’t okay.
अनन्या बिर्ला यांच्या आईनेही ट्वीटवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. नीरजा बिर्ला यांनी ट्विटवर लिहलं की, "स्कोपा रेस्ताराँमधील लोकांचं आमच्याशी वागणं अतिशय धक्कादायक होतं. कोणत्याही रेस्तराँला ग्राहकांशी असं वागण्याचा अधिकार नाही."
अनेक सेलिब्रिटींनी अनन्याने केलेल्या ट्वीटचं समर्थन केलं आहे. भारतातील अनेक सेलिब्रिटींना याआधीही वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत.