Home /News /videsh /

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला, 45 जवान ठार; हल्लेखोरांचा दावा

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला, 45 जवान ठार; हल्लेखोरांचा दावा

पाकिस्तानच्या (Pakistan) नैऋत्य बलुचिस्तान (Balochistan province) प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी पुन्हा एकदा लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केला आहे.

    पाकिस्तान, 03 फेब्रुवारी: पाकिस्तानच्या (Pakistan) नैऋत्य बलुचिस्तान (Balochistan province) प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी पुन्हा एकदा लष्कराच्या चौक्यांवर हल्ला केला आहे. बुधवारी रात्री उशिरा नौशकी आणि पंजगूर भागातील दोन सुरक्षा चौक्यांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. या चकमकीत किमान चार हल्लेखोर ठार झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्सवर केला आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 45 जवान मारले गेल्याचा दावा केला जात आहे, मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने या हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. लष्कराच्या निवेदनानुसार, पहिला हल्ला बलुचिस्तान जिल्ह्यातील पंजगुर जिल्ह्यात झाला. ISPR नं सांगितलं की, पहिल्या हल्ल्याच्या काही तासांनंतर हल्लेखोरांनी नौशकी, बलुचिस्तानमधील सुरक्षा छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनिकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि चार हल्लेखोरांना ठार केले. दहशतवाद्यांचे मोठं नुकसान करताना दोन्ही हल्ले यशस्वीपणे उधळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जाफराबाद जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील जाफराबाद जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह 17 जण जखमी झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री जाफराबाद जिल्ह्यातील डेरा अल्लाहयार शहरातील गर्दीच्या बाजारपेठेत अज्ञात बाईक चालकांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचार्‍यांसह किमान 17 जण जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. दहशतवादी आणि बलुच फुटीरतावादी वारंवार प्रांतातील सुरक्षा दलांना आणि प्रतिष्ठानांना लक्ष्य करत असल्यानं हा हल्ला दोन सैनिकांना उद्देशून असावा अशी भीती एका पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. बलुचिस्तानमध्ये सातत्याने हल्ले इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या प्रदेशातील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला लक्ष्य करून बलुच दहशतवादी गटांनी अनेक हल्ले केले आहेत. शुक्रवारी प्रांतातील सुई भागात सुरक्षा दलांचे एक वाहन सुरुंगाखाली आले आणि या स्फोटात किमान चार जवान ठार आणि डझनभर कर्मचारी जखमी झाले. 25-26 जानेवारीच्या रात्री अशांत प्रांतातील केच जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pakistan, Pakistan army

    पुढील बातम्या